डांबर खरेदीतील भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करा !

महापालिका आयुक्तांचा आदेश !

पुणे – महापालिकेला डांबर पुरवणार्‍या ठेकेदाराने अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने महापालिकेची लूट केल्याचा आरोप महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अधिवक्ता नीलेश निकम यांनी केला. या आरोपानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘शिवम ग्रीन एनर्जी’ या ठेकेदार आस्थापनाने महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप निकम यांनी केला आहे. या ठेकेदाराने महापालिकेला डांबरपुरवठा केल्याची देयके दाखवून तेच डांबर पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच्या कामांसाठी पाठवल्याचे दाखवले.

महापालिकेला डांबर मिळाले नसतांनाही त्याचे पैसे दिल्याचा आरोप अधिवक्ता निकम यांनी केला आहे. ठेकेदाराच्या वतीने डांबर खरेदी केल्याने महापालिकेला १० ते १२ कोटी रुपये अधिक द्यावे लागत आहेत, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेने डांबरपुरवठ्याची ३ वर्षांसाठी निविदा काढली असून पुन्हा ‘शिवम ग्रीन एनर्जी’ या एकाच आस्थापनाची निविदा आली आहे. त्यामुळे फसवणूक करणार्‍या आस्थापनाला काम देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी हस्तक्षेप करून ही खरेदी थांबवावी, तसेच मागील खरेदीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. आर्थिक हानी टाळण्यासाठी महापालिकेने आस्थापनांकडून डांबर खरेदी करावे, अशी मागणी निकम यांनी केली. प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन होईपर्यंत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. भोसले यांनी दिले.

संपादकीय भूमिका

आपल्या देशामध्ये असे एकही क्षेत्र नाही, जिथे भ्रष्टाचार होत नाही. एरव्ही सर्वसामान्य व्यक्तीला धारेवर धरणारे भ्रष्टाचार्‍यांना मोकाट सोडतात !