
कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीदिवशी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडी गेली अनेक वर्षे काढण्यात येते. या वारीत सहस्रो वारकरी समुदायासह जिल्ह्यातील लाखो भाविक सहभागी होतात. या वारीसाठी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या मातोश्री कै. (सौ.) मालन आणि वडील कै. विनायकराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीस ७० किलो चांदीचा रथ अर्पण केला. हा रथ संपूर्ण सागवानी असून त्यावर चांदीचे काम केले आहे.

दसरा चौक येथे झालेल्या या सोहळ्यासाठी जगदगुरु तुकोबारायांचे विद्यावंशज ह.भ.प. चैतन्य सदगुरु गोपाळ (आण्णा) वासकर महाराज, पू. आनंदनाथ महाराज सांगवडेकर, आळंदी देवस्थानचे ह.भ.प. बाळासाहेब महाराज चोपदार, ह.भ.प. महादेव महाराज यादव, शिवसेनेचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, सौ. वैशाली क्षीरसागर यांसह अन्य उपस्थित होते. या प्रसंगी रथाचे कारागीर संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बाळासाहेब चोपदार म्हणाले, ‘‘तुकाराम पवार यांनी वर्ष १९८२ मध्ये आळंदीला ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि मूर्ती भेट दिली. त्या वेळेपासून नंदवाळला दिंडी चालू झाली. सद्यस्थितीत सुमारे दीड लाख वारकरी यात सहभागी होतात.’’ ह.भ.प.चैतन्य सदगुरु गोपाळ (आण्णा) वासकर महाराज म्हणाले, ‘‘या रथातून ज्ञानेश्वरमाऊली यांचे ज्ञान, त्याग, ऐश्वर्य अनुभवण्यास मिळणार आहे.’’
View this post on Instagram
या प्रसंगी नंदवाळ येथील प्रसिद्ध प्रवचनकार श्री. तानाजी निकम म्हणाले, ‘‘नंदवाळमधील दिंडीत लाखो भाविक येत असल्याने तेथे वाहनतळाची सोय करावी. सध्या हा सोहळा पुईखडी येथे होतो, त्याऐवजी हा नंदवाळच्या गायरानमध्ये जर होऊ शकला, तर त्याचा अधिक भाविकांना लाभ मिळेल.’’