हिंदु धर्म रक्षणासाठी युवकांनी सिद्ध व्हावे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

सातारा, ३ एप्रिल (वार्ता.) – भारताला जाज्वल्य इतिहासाची परंपरा आहे. इतिहास सांगण्यासाठी नसतो, तर तो अनुकरण करण्यासाठी असतो. छत्रपती शिवराय यांनी जगायचे कसे, तर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी मरायचे कसे, याचा आदर्श आपल्यासमोर घालून दिला आहे. हिंदू सुरक्षित राहिला, तर संपूर्ण विश्व सुरक्षित राहील. त्यामुळे हिंदु धर्म रक्षणासाठी आता युवकांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. कोडोली येथील नुकत्याच झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून आयोजित बलीदान मास समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी उपस्थित होते.

अभय वर्तक म्हणाले की, यापूर्वी हिंदु धर्मावर अनेक आघात झाले आहेत; मात्र आपल्या पूर्वजांनी मोठ्या धाडसाने आणि शौर्याने हिंदु धर्मावर होणारे आघात नष्ट केले. आपला शौर्याचा इतिहास नष्ट करण्याचे षड्यंत्र आजपर्यंत आपण सहन केले; मात्र यापुढे आपल्या जाज्वल्य इतिहासाची पारायणे आपण करायची आहेत. त्यामुळेच आपल्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होणार आहे. जो इतिहास विसरतो, त्याचा वर्तमान आणि भविष्यकाळही अंध:कारमय होतो.