सातारा नगरपालिकेकडून ४४ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल जमा !

सातारा, ३ एप्रिल (वार्ता.) – सातारा नगरपालिकेने ८५ टक्के महसुलाची वसुली पूर्ण केली आहे. ५२ कोटी रुपयांपैकी ४४ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल वसुली विभागाने राबवलेल्या विविध मोहिमांमुळे सातारा नगरपालिकेकडे जमा झाला आहे. सातारा नगरपालिकेला पाणीपट्टी, घरपट्टी, शिक्षण कर, रोजगार हमी असे विविध प्रकारचे कर मिळून ५२ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट गाठायचे होते.  नवीन आर्थिक वर्ष चालू होताच पालिका प्रशासनाने करवसुली मोहिमेला आणखी गती दिली आहे. करवसुलीसाठी शहर आणि सीमा वाढ भागांमध्ये १० विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता लाखबंद (सील) करून नळजोडणी खंडित करण्यात आली होती. शहरातील ४१ थकबाकीदारांच्या मालमत्ता लाखबंद करण्यात आल्या, तसेच ६४ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. नगरपालिकेकडे जमा झालेल्या करापैकी ८ कोटी रुपये शिक्षण कर आणि रोजगार हमी यांसाठी महाराष्ट्र शासनाकडे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली आहे.