मगोप-भाजप युती अबाधित
पणजी, ३ एप्रिल (वार्ता.) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांची मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ३ एप्रिल या दिवशी भाजपच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोघांचीही या वेळी बैठक झाली आणि भाजप-मगोप युती अबाधित असल्याचे बैठकीनंतर घोषित करण्यात आले. बैठकीविषयी माध्यमांना दामू नाईक म्हणाले, ‘‘सध्या दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. युती व्यवस्थित आहे आणि दोघांमध्येही योग्य समन्वय आहे. भविष्यात काय होईल, ते काळानुसार ठरेल. मगो पक्षाने भाजपच्या मतदारसंघामध्ये लुडबूड न करता युतीचा धर्म पाळावा एवढीच अपेक्षा आहे.’’
मगोपच्या केंद्रीय समितीची झाली बैठक
मगोपच्या केंद्रीय समितीची ३ एप्रिल या दिवशी बैठक झाली. भाजप-मगोप युती कायम ठेवण्याविषयी बैठकीत निर्णय झाला. हिंदूंच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशी यामागील भूमिका आहे, अशी माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली आहे. या बैठकीला नारायण सावंत यांच्यासह काही पदाधिकार्यांची उपस्थिती होती. दीपक ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘आमदार जीत आरोलकर यांच्याकडे आम्ही पूर्ण पेडणे तालुक्याचे दायित्व देण्याचे ठरवले आहे. पेडणे तालुक्यात मगो पक्ष आणखी भक्कम करण्याचे दायित्व आमदार जीत आरोलकर यांचे आहे. पक्षाचे फोंडा येथील नेते डॉ. केतन भाटीकर यांना २ दिवसांत नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.’’