गोव्यात जानेवारी महिन्यात कुत्र्याने चावा घेतल्याच्या प्रतिदिन ५७ घटना

गोव्यात कुत्र्याने चावा घेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ

पणजी, ३ एप्रिल (वार्ता.) – राज्यात कुत्र्याने चावा घेण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा जानेवारी महिन्यात कुत्र्याने चावा घेतल्याच्या १ सहस्र ७८९ घटना घडल्या आहेत. म्हणजे प्रतिदिन ५७ घटना घडल्या आहेत, ही माहिती केंद्रीय मत्सोद्योग, पशूसंवर्धन आणि डेअरी राज्यमंत्री प्रा. एस्.पी. सिंह यांनी १ एप्रिल या दिवशी लोकसभेत एका प्रश्नावरील लेखी उत्तरात दिली.

केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस्.पी. सिंह म्हणाले, ‘‘भटक्या कुत्र्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राण्यांच्या जन्म नियंत्रण कार्यक्रमाचा काय प्रभाव पडला, याचे औपचारिक मूल्यांकन सरकारने केलेले नाही. हे औपचारिक मूल्यांकन करणे, हाच या समस्येवर प्रभावी उपाय आहे.’’ वास्तविक गोवा राज्य हे देशातील रेबिज रोगावर नियंत्रण आणणारे देशातील पहिले राज्य आहे. गोव्यात गेल्या ५ वर्षांत रेबिजची (कुत्रा चावल्याने होणार्‍या रोगाची) लागण होऊन एकही व्यक्ती दगावलेली नाही; मात्र राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे आणि कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.

सासष्टी समुद्रकिनारपट्टीत मागील ३ महिन्यांत कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बहुतांश घटनांमध्ये समुद्रकिनार्‍यावर चालत जातांना कुत्र्यांनी आक्रमण केलेले आहे. वर्ष २०२२ मध्ये गोव्यात कुत्र्याने चावा घेण्याच्या ८ सहस्र ५७ घटना, वर्ष २०२३ मध्ये ११ सहस्र ९०४ घटना आणि वर्ष २०२४ मध्ये १७ सहस्र २३६ घटना घडल्या आहेत. २ वर्षांत या घटना दुपटीने वाढल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गत आठवड्यात विधानसभेत अर्थसंकल्प मांडतांना राज्यातील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवली जाणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘स्टरलायझेशन’ आणि लसीकरण मोहीम हाती घेणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या वेळी प्राण्यांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी फिरते पशूवैद्यकीय चिकित्सालय लवकरच चालू करणार असल्याचे म्हट