सिद्धरामय्या यांच्या विरोधात लिखाण करणारा सरकारी शाळेतील शिक्षक निलंबित !

सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात राज्यावरील कर्जात सर्वाधिक वाढ झाल्याची माहिती उघड केल्याने कारवाई !

बेंगळुरू – फेसबुकवर सिद्धरामय्या यांच्या विरोधात लिखाण करणारे चित्रदुर्ग जिल्ह्यातील कानुबेनहल्ली येथील सरकारी शाळेतील शिक्षक शांतन मूर्ती यांना निलंबित करण्यात आले. शांतन मूर्ती यांनी त्यांच्या लेखनात सिद्धरामय्या यांनी जनतेला सर्व विनामूल्य देण्याचे धोरण अवलंबले आहे, त्यामुळे राज्यावरील कर्ज वाढत चालले आहे, असे मत मांडले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, माजी मुख्यमंत्री एस्.एम्. कृष्णा यांच्या कार्यकाळात कर्नाटक राज्यावर ३ सहस्र ५९० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यानंतर धरम सिंह सरकारच्या काळात ते १५ सहस्र ६३५ कोटी रुपयांचे कर्ज होते. एच्.डी. कुमारस्वामी यांच्या काळात ते आणखी वाढले. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या काळात ते आणखी वाढून २५ सहस्र ६५३ रुपये इतके झाले. त्यांनतरच्या अनेक मुख्मंत्र्यांच्या काळात ते वाढले; परंतु सिद्धरामय्या यांच्या मागील कार्यकाळात कर्जाची रक्कम २ लाख ४२ सहस्र कोटी रुपये इतकी प्रचंड वाढली. यास त्यांचे सर्व विनामूल्य देण्याचे धोरण कारणीभूत आहे.

शांतन मूर्ती यांच्या या विधानामुळे चित्रदुर्ग जिल्ह्याच्या नागरी सूचना विभागाचे उपसंचालक रविशंकर रेड्डी यांनी मूर्ती यांना निलंबित करण्याचा आदेश दिला.

संपादकीय भूमिका

  • एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आता गप्प का ? यावरून सिद्धरामय्या यांचा कारभार हुकूमशाही पद्धतीचा आहे, हेच स्पष्ट होते !
  • व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून राजकारण्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोललेले चालत नाही; पण हिंदूंच्या देवतांच्या विरोधात बोलून देवतांचा अवमान केलेला मात्र चालतो ! हे चित्र पालटायला हवे !