२ सहस्र रुपयांच्या नोटा ओळखपत्राविना पालटण्याच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

भाजपचे नेते आणि अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय

नवी देहली – रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बंद करत त्या बँकांमधून पालटून घेण्यास सांगितले आहे. नोटा पालटतांना ओळखपत्राची आवश्यकता नसल्याचे किंवा कोणताही अर्ज भरण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. या निर्णयाच्या विरोधात भाजपचे नेते आणि अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय यांनी देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

श्री. उपाध्याय यांच्या याचिकेमध्ये रिझर्व्ह बँकेचा निर्णय मनमानी, तर्कहीन आणि राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन आहे, असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या निर्णयामुळे फुटीरतावादी, आतंकवादी, माओवादी, अमली पदार्थांचे तस्कर, माफिया, भ्रष्टाचारी आदी लोक याचा अपलाभ घेत काळा पैसा पांढरा करतील. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या बँक खात्यांमध्येच हे पैसे जमा करावेत. यामुळे काळा पैशांवर नियंत्रण ठेवता येऊ शकतेे. देशात आता प्रत्येक व्यक्तीकडे बँक खाते आहे. असे असतांना रिझर्व्ह बँक ओखळपत्राविना नोटा पालटण्याची अनुमती का देत आहे?, असा प्रश्‍न या याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.