सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन थांबवण्याची मनसेची मागणी

सावंतवाडी – तालुक्यातील तळवणे, मळेवाड, कोंडूरा आणि धाकोरा भागांत अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन चालू आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून महसूल विभागाने हे उत्खनन थांबवावे आणि त्या ठिकाणी पंचनामे करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कायदेशीर मार्गाने याविरोधात आवाज उठवू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसेने) एका निवेदनाद्वारे तहसीलदार अरुण उंडे यांना दिली आहे.

गौण खनिजाचे अवैध उत्खनन (चिरे खाण)

या निवेदनात म्हटले आहे की, चिरे खाणीसाठी एका भूमीचा अहवाल दाखवून दुसर्‍याच भूमीत चिर्‍यांचे उत्खनन चालू आहे. या दोन्ही भूमींचा सातबारा वेगवेगळा आहे. एका व्यक्तीच्या अनुमतीवर एकाहून अधिक चिर्‍यांच्या खाणी चालू आहेत. प्रत्यक्षात असलेल्या चिरे खाणींपैकी बर्‍याच खाणी अवैधरित्या चालू आहेत. याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केला असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. याठिकाणी वायू आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.

तहसीलदार यांना निवेदन देतांना मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा मनविसेचे (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे) जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, मनविसेचे शहराध्यक्ष नीलेश देसाई आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.