श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तांवर कपडे परिधान करण्याच्या संदर्भात निर्बंध नाहीत !

मंदिर संस्थानचे ७ घंट्यांत सुधारित आदेश

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने केवळ ७ घंट्यांत भूमिका पालटली !

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात, ‘यापुढे मंदिरात अश्‍लील, तोकडे कपडे परिधान करून येऊ नयेत’, असे फलक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने १८ मे या दिवशी सकाळी लावले होते; मात्र केवळ ७ घंट्यांत देवस्थानाने भूमिका पालटत ‘मंदिरात पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत’, असे लेखी आदेश तहसीलदार तथा व्यवस्थापक यांनी काढले आहेत.

या संदर्भात भक्तांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात असून ‘केवळ काही लोकांनी टीका केल्यामुळे योग्य निर्णय पालटणे चुकीचे आहे’, असे मत भक्तांनी व्यक्त केले आहे.

संपादकीय भूमिका

मंदिरांचे पावित्र्य जपण्यासह भाविकांनाही आध्यात्मिक लाभ मिळवून देऊ शकणारे निर्णय घेऊन ते त्वरित मागे घेणे, यातून सरकारी अधिकार्‍यांची मंदिरांप्रती कचखाऊ भूमिका लक्षात येते. ‘मंदिरे भक्तांच्या हाती सोपवणे का आवश्यक आहे’, हे यातून लक्षात येते !