आषाढी एकादशीनिमित्त ५ सहस्र विशेष बस सोडणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – आषाढी एकादशीच्या निमित्ताने एस्.टी. महामंडळाच्या वतीने ५ सहस्र विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या २५ जून ते ५ जुलै या कालावधीत धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी, म्हणजे २७ जून २०२३ या दिवशीही अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एस्.टी.ने केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. या वेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

आषाढी यात्रेसाठी एस्.टी. महामंडळाच्या मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या ६ विभागांतून गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारकरी, भाविक, तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पहाता एकाच बसस्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग आणि विठ्ठल कारखाना यात्रास्थानक अशी ४ तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्रा काळात बसस्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.