सनातनी हिंदु जागे होऊन मतदान करतील, तेव्हाच हिंदु राष्ट्र येईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पाटलीपुत्र (बिहार) – ज्या दिवशी सनातनी हिंदु जागे होतील आणि त्यांना त्यांच्या मताचा अधिकार लक्षात येईल, तेव्हा भारत हिंदु राष्ट्र बनेल, असे विधान बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भक्तांशी बोलतांना केले.

ते पुढे म्हणाले की, मी राजकीय नेता नाही आणि मी कुणाला पाठिंबाही देत नाही. हिंदु राष्ट्र आम्हाला कागदावर नाही, तर हृदयामध्ये हवे आहे. त्यामुळे आपली संस्कृती सुरक्षित राहील.

(सौजन्य : IndiaTV)  

(म्हणे) ‘धर्मगुरूंना अशा विषयांवर बोलण्याचा अधिकार नाही !’ – जनता दल (संयुक्त)

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना जनता दल (संयुक्त) पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, अशा प्रकारची विधाने करणे, हे धर्मगुरूंचे काम नाही. धर्मगुरूंना अशा विषयांवर बोलण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची विधाने सामाजिक माध्यमांतून देऊन काहीही होणार नाही. हिंदु राष्ट्रासाठी संसदेत जावे लागेल.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रासाठी राज्यघटना पालटणार का ?’ – राजद

राष्ट्रीय जनता दलाचे नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, भारत राज्यघटनेद्वारे आणि कायद्याद्वारे चालणारे राष्ट्र आहे. मी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना विचारू इच्छितो की, ते हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी राज्यघटना पालटणार का ?

संपादकीय भूमिका

राज्यघटनेत आतापर्यंत १०० वेळा सुधारणा करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही पद्धतीने राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द घुसडले. अशा वेळी हिंदूंनी निवडून दिलेल्या खासदारांनी राज्यघटनेत ‘हिंदु राष्ट्र’ अशी सुधारणा केली, तर त्यात चुकीचे काय ?