किशोर आवारे हत्या प्रकरण
पुणे – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. १३ मे या दिवशी सायंकाळी किशोर आवारे समर्थक काही महिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ‘आमच्या भाऊंना न्याय द्या’, असे म्हणत उपस्थित महिलांनी किशोर आवारे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘भरदिवसा किशोर आवारे यांच्यासारख्या व्यक्तीची हत्या होत असेल, तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का ?’, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले की, घटना घडल्यापासून पोलीस सातत्याने काम करत आहेत. या घटनेचे अन्वेषण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेगळे पथक सिद्ध केले आहे. आयुक्तालयातील चांगल्या अधिकार्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पोलीस अन्वेषण करत आहेत. नागरिकांनी संयम ठेवावा.
Talegaon : साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या; महिलांचा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चाhttps://t.co/IczPP1hSVv
— Pune News (@mpcnewspune) May 13, 2023
उपस्थित महिलांशी साहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष हत्या करणारे ४ आरोपी, तर त्यांना सहकार्य करणार्या एका आरोपीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत. अन्वेषण करून पोलीस न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करतील. पोलीस निपक्षपातीपणे अन्वेषण करत आहेत.