विचार करायला लावणारी कथा : द केरल स्टोरी !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट म्हणजे अनेक प्रश्‍न स्वत:लाच विचारायला लावणारी कथा आहे. ‘मुलींनी वयाच्या ज्या टप्प्यावर हा चित्रपट पाहिला पाहिजे, त्या वयात त्यांना तो पहाता येणार नाही’, असे प्रमाणपत्र चित्रपटाला मिळाले आहे. या चित्रपटातील प्रसंगांपेक्षा अधिक किळसवाणी हिंसा आणि बीभत्स प्रणय मुले पाहून मोकळी झालेली असतात, हे बहुधा ओवळे टाकून सोवळे शोधणार्‍या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (‘सेन्सॉर बोर्डा’च्या) गावी नसावे.

१. चित्रपटातील ‘बोलकी’ दृश्ये बरेच काही सांगून जाणारी !

‘एरव्ही आपण पहातो ‘तो चित्रपट आहे’, याची जाणीव प्रत्येक चौकटीमधून (‘फ्रेम’मधून) करून देणारे अनेक चित्रपट येतात आणि जातात. ४ मुलींवर बेतलेली ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाची कथा, ही खरे तर ४ विचारधारांचे प्रवाह आहेत. त्यांतील २ हिंदु आहेत, एक ख्रिस्ती आणि एक मुसलमान आहे. हिंदूंमधील एक साम्यवादी आहे. हिंदुत्व, साम्यवाद, ख्रिस्तीवाद आणि इस्लाम यांच्यावर लहान लहान गोष्टींवर दाखवण्यात आलेले भाष्य फार महत्त्वाचे आहे. जे संवाद आहेत, त्यांपेक्षाही जिथे केवळ कॅमेरा सरकतांना काही दृश्ये बोलतात ते समजणे फार आवश्यक आहे. जेवायला गेल्यानंतर मुसलमान मुलगी, ख्रिस्ती, साम्यवादी आणि हिंदु मुलगी यांचे वागणे, बसणे, जेवणाच्या आधी प्रार्थना करणे अन् त्यांवरचा संवाद, ही प्रत्येकीची लहानपणापासून सिद्ध झालेली भूमिका सांगून जाते. नृत्य करायला तिघी मुली जातात, तेव्हा मुसलमान मुलगी तिथेच बसून रहाते. हे दृश्य साधे आहे; पण पुष्कळ काही सांगून जाते.

२. इसिस आणि सांस्कृतिक विस्तारवादाच्या आतंकवादी स्वरूपाची जाणीव करून देणारा चित्रपट !

येथे सांगण्यासारखे आणि स्वत:लाच प्रश्‍न विचारण्यासारखे पुष्कळ काही आहे. ‘हा चित्रपट इस्लामविरोधी नाही, तर आतंकवादाच्या विरोधात आहे. इस्लाम उलगडून सांगणारा आहे. ‘जगभर एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या इस्लामी आणि साम्यवादी विचारधारा भारतात मात्र हातात हात घालून एकमेकांची पाठराखण करत फिरतात’, हे सांगणारा हा चित्रपट आहे. केवळ हिंदूंनीच नव्हे, तर मुसलमानांनीही हा चित्रपट अवश्य पहावा. ‘संपूर्ण जग इस्लाममय झाले, तर काय होईल ?’, याचा अंदाज हा चित्रपट पाहून येईल. (चित्रपटात ‘लिप्स्टिक लावली, तर हात कापण्याची शिक्षा इस्लाममध्ये आहे, हे भारतात कुणीच सांगितले नाही’, हा संवादही पुष्कळ काही सांगून जातो.) चित्रपट पाहून सांस्कृतिक विस्तारवादाचे आतंकवादी स्वरूप या चित्रपटातून लक्षात येईल. आपण धर्माने हिंदु रहाणे किती हितावह आहे, याचा अंदाज येईल. साम्यवादाच्या भारावलेपणातून बाहेर न पडलेल्यांना ‘आपण काय गमावले आहे ?’, याचा अंदाज येईल. जसा हा चित्रपट इस्लामविरोधी नाही, तसाच तो केरळविरोधीही नाही. हा चित्रपट इसिसला विरोध करतो. भारतभरातील मुसलमानांनी, ‘इसिसच्या विरोधात चित्रपट म्हणजे इस्लामविरोधात चित्रपट असे आहे का ?’ , ‘केरळमध्ये घडणारी घटना, म्हणजे केरळच्या विरोधात आहे का ?’, हे ठरवायचे आहे.

३. कुटुंब, संस्कृती, श्रद्धा आणि धर्म संपवण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीची कथा सांगणारा चित्रपट !

इस्लामी सांस्कृतिक विस्तारवाद आणि साम्यवाद यांनी हातात हात घालून कुटुंब, संस्कृती, श्रद्धा अन् धर्म संपवण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. ‘आपली तान्हुली मुलगी परत आणून द्या’, असे म्हणून टाहो फोडणार्‍या मातेपासून चालू होणारी चित्रपटाची कथा, आपल्याला सोडून गेलेल्या मुलीच्या जीवनाची वाताहत झालेली पाहून दु:खी होणार्‍या तिच्याच आईपाशी येऊन थांबते. ३ मुलींच्या व्यथेसह ही २ आईंचीही व्यथा आहे. अगदी प्रारंभीपासून शेवटपर्यंत निखळत चाललेल्या कुटुंबातील ‘आई’ या घटकाच्या वेदना सूक्ष्मपणे सांगणे हेलावून गेले. ‘आजी, आई आणि नात यांचे संबंध; ‘आपली मुलगी इस्लाम स्वीकारून निकाह करत आहे’, हे कळाल्यावर जावयासह मुलीलाही स्वीकारण्याची सिद्धता दाखवणारी आई, ‘मुलीला यायचेच नाही’, हे कळाल्यावर व्याकुळ झालेली आई, मुलीच्या न येण्याचे कारण कळाल्यावर हातातून भ्रमणभाष संच गळून पडलेली आई, मुलीने संपर्क केला म्हणून तिला भेटायला डबा घेऊन जाणारी आई आणि शेवटी भ्रमणभाषवर मुलीला ‘आई झाल्यावर कसे वाटते ?’, असे विचारणारी आई’, हा एक सलग अनुबंध (संबंध) आहे, जो विस्कटून गेलेल्या कुटुंबाचे धागे सोडवत जातो.

४. केवळ चित्रपट नाही, तर विचार !

त्या आईचे दु:ख बहुधा मला आणखी अनेक दिवस छळत रहाणार आहे. प्रत्येक आई-वडिलांनी हा चित्रपट पहावा. ‘हा केवळ चित्रपट नाही, तर विचार आहे की, जो प्रत्येकाने करावा.

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (७.५.२०२३)

(साभार : ‘प्रसन्न वदने’ या ‘ब्लॉग’वरून)