केरळमधील अनघा नावाच्या तरुणीने सांगितले अनुभव !
थिरूवंनतपूरम् (केरळ) – केरळमधील ‘लव्ह जिहाद’ची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणार्या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटानंतर अनेक पीडित तरुणी पुढे येऊन त्यांच्या संदर्भात घडलेल्या घटनांची माहिती देऊ लागल्या आहेत. त्यांपैकी केरळमधील त्रिशूर येथील अनघा नावाच्या तरुणीनेही माहिती दिली आहे. तिचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
‘जो पर्दा नहीं करते उसे अल्लाह जहन्नुम की आग में डाल देते हैं’: जिसे मुस्लिम रूममेट ने पहनाया ‘बुर्का’, उसने कहा मेरा इस्लामी धर्मांतरण भी ‘द केरल स्टोरी’ जैसी#KeralaStory https://t.co/hqIwNol8o3
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 8, 2023
अनघाने ‘रिपब्लिक इंडिया’ या वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना सांगितले की,
माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. माझ्या कुटुंबात माझ्या आई-वडिलांखेरीज मला २ बहिणी आहेत. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि ‘आर्शा विद्या समाजा’ची पूर्णवेळ कार्यकर्ती आहे. मी ५ मे या दिवशी मी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून मला वाटले की, त्याची कथा माझ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे. वर्ष २०२० मध्ये आर्शा विद्या समाजामध्ये येण्यापूर्वी मी इस्लामचे अनुकरण करत होते. त्याच काळात मी धर्मांतर केले. त्यानंतर मी आर्शा विद्या समाजामध्ये सहभागी झाले.
मुसलमान तरुणीच्या हिंदु धर्माविषयीच्या प्रश्नांवर मी निरुत्तर झाले !
त्या काळात मी माझा धर्म, खरा इतिहास आणि देशातील चालू घडामोडी यांकडे दुर्लक्ष करून इस्लामला अधिक महत्त्व देऊ लागले. इस्लामविषयी वाचन चालू केले. माझ्या महाविद्यालयाच्या दिवसात मी एर्नाकुलम्च्या वसतीगृहामध्ये रहात होते. तेथे माझ्या खोलीत रहाणारी मुसलमान तरुणी मला हिंदु धर्माविषयी प्रश्न विचारायची. माझ्या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायची. त्या वेळी मला तिच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मला माझ्या धर्माविषयी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मी गप्प बसायचे.
माझ्या आई-वडिलांना धर्माचे ज्ञान नव्हते !
मी माझ्या पालकांशीही या प्रश्नांविषयी चर्चा केली; पण त्यांनीही मला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर मी सामाजिक माध्यमांवर शोध चालू केला; पण तेथेही मला काही समाधानकारक आढळले नाही. मग मला हिंदु धर्माच्या वैधतेविषयी शंका येऊ लागली. दुसरीकडे जेव्हा मी माझ्या खोलीतील मुसलमान तरुणीला इस्लामविषयी प्रश्न विचारले, तेव्हा तिने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; कारण तिला लहानपणापासून इस्लाम शिकवला गेला होता. तिने हिंदु धर्मावर टीका केली; पण माझ्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. (हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची किती आवश्यकता आहे, हे हिंदूंच्या संघटनांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)
मला झाकीर नाईक यांचे व्हिडिओ दाखवून धर्मांतर करायला उद्युक्त केले !
मुसलमान तरुणीने मला सांगितले की ‘अल्ला हा एकमेव देव आहे.’ ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटातील मुख्य पात्राच्या संदर्भात जे घडते, तेच माझ्यासमवेत खर्या आयुष्यात घडले आहे. माझ्यावर हळूहळू माझ्या मुसलमान मैत्रिणीचा प्रभाव पडू लागला. तिचे शब्द मला योग्य वाटू लागले. त्यामुळे मी तिच्याकडून इस्लाम धर्म शिकू लागले. तिने मला अनुवादित कुराणही दिले, तसेच अधिक अभ्यासासाठी मला झाकीर नाईक, एम्.एम्. अकबर आणि काही लोकांचे व्हिडिओही दाखवले. तिने मला वारंवार इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालण्याची सूचना केली आणि सांगितले, ‘जर तुम्ही तुमचे शरीर दाखवले, तर अल्ला तुम्हाला नरकाच्या आगीत टाकील. बुरख्यात रहाणार्या महिलांना अल्ला नेहमीच साहाय्य करतो.’
श्रुती नावाच्या तरुणीचेही अशाच प्रकारे धर्मांतर !
केरळच्या श्रुती नावाच्या तरुणीचेही अशाच प्रकारे धर्मांतर झाले होते. तिने सांगितले की, महाविद्यालयामध्ये पदवी घेत असतांना मुसलमान मैत्रिणीने तिचा बुद्धीभेद केला होता. त्यातून तिने धर्मांतर केले. धर्मांतरानंतर तिला रेहमत हे नाव देण्यात आले.