बजरंग दलावरील बंदीचे प्रयत्न हिंदु समाजच उधळून लावेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

श्री मिलिंद परांडे (संग्रहित छायाचित्र)

नागपूर – विधानसभेच्‍या निवडणुका जवळ येतील, तसतसे हिंदु संघटनांना लक्ष्य केले जाईल. आता काँग्रेस तेच करत आहे. केवळ मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्‍या अराष्‍ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्‍या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ? हिंदु समाज विहिंपची ताकद आहे. हा समाजच बजरंग दलावरील बंदीचे प्रयत्न उधळून लावेल, अशी चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी येथे दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्‍या घोषणानाम्‍यात काँग्रेसने सत्तेवर आल्‍यास बजरंग दल आणि ‘पी.एफ्.आय.’ संघटनेवर बंदी घालण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर एका वृत्तपत्राच्‍या प्रतिनिधीने घेतलेल्‍या विशेष मुलाखतीत त्‍यांनी वरील विधान केले आहे.

मुलाखतीत मिलिंद परांडे म्‍हणाले…

१. ‘अयोध्‍येतच भव्‍य श्रीराम मंदिर बांधू’, असे विहिंपने दिलेले वचन पूर्ण केले. आता लवकरच काशी आणि मथुरा यांचीही वचनपूर्ती हिंदु समाज करील. श्रीराम मंदिराच्‍या आंदोलनात संपूर्ण हिंदु समाज उतरला होता. विहिंपने त्‍या आंदोलनाचे नेतृत्‍व केले होते. काशी आणि मथुरा यांच्‍याविषयीही विहिंप हिंदु समाजाच्‍या मागे संघटन उभे करील.

२. ‘पी.एफ्.आय.’सारख्‍या अराष्‍ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलाची तुलना करणे चुकीचे आहे. काँग्रेसने आधी श्रीराम मंदिराला आणि आता बजरंग दलाला विरोध केला आहे. आम्‍ही या विरोधात हिंदु समाजात जाऊन जनजागृती करू.

३. विहिंपचा दैनंदिन राजकारणात थेट सहभाग नसला, तरी केंद्रात आणि सर्व राज्‍यात हिंदुहिताला जपणारे सत्तेत यावेत, तसेच देश अन् राज्‍य यांची धुरा योग्‍य लोकांच्‍या हातात रहावी, यासाठी अनुमाने ७२ लाख हितचिंतक देशव्‍यापी जनजागरण मोहीम हाती घेणार आहेत.

४. हिंदुहिताचे रक्षण करणारी सरकारे केंद्रात आणि राज्‍यात असायला हवीत, यासाठी लोकांमध्‍ये जाऊन त्‍यांना वस्‍तूस्‍थिती समजावून सांगू. देश आणि समाज यांच्‍यासमोरील आव्‍हाने अन् त्‍यावर मात कशी करता येईल, हे लोकांना वारंवार सांगणे आवश्‍यक आहे.

५. हिंदुहिताची सरकारे येण्‍यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्‍येने घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे. यासाठी लोकांशी संपर्क साधून त्‍यांना मतदानासाठी प्रेरित करण्‍याचे काम विहिंप करणार आहे. प्रत्‍येकच ठिकाणी प्रत्‍यक्ष जाणे शक्‍य नसल्‍यास त्‍यासाठी प्रसंगी डिजिटल माध्‍यमांचा उपयोग करता येईल का ? याचाही विचार करू.

६. विहिंपने ६ नोव्‍हेंबर २०२२ पासून संपूर्ण देशात हितचिंतक म्‍हणजेच सदस्‍यता मोहीम हाती घेतली होती. २० नोव्‍हेंबरपर्यंत संपूर्ण भारतात दीड लाख गावांत संपर्क साधून १ कोटी हिंतचिंतक जोडण्‍यात येणार होते. त्‍यापैकी अनुमाने ७२ लाख हितचिंतक जोडले आहेत.

७. ३४ लाखांहून अधिक युवक बजरंग दलाशी जोडले गेले. १६ लाखांहून अधिक महिला हितचिंतक झाल्‍या. महाराष्‍ट्रात ७ लाख, मध्‍य प्रदेशात ९ लाख, उत्तरप्रदेश ९ लाख, तर दक्षिणेत १ ते दीड लाख हितचिंतक आहेत.