ऑनलाईन सुनावणीच्या वेळी विचारपूर्वक बोला ! –  सरन्यायाधिशांचा न्यायमूर्तींना सल्ला

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

कटक (ओडिशा) – ऑनलाईन सुनावणीच्या वेळी न्यायमूर्तींनी अत्यंत विचारपूर्वक बोलले पाहिजे; कारण न्यायालयामध्ये जे घडते ते अत्यंत गंभीर प्रकरण असते. न्यायमूर्तींच्या विधानाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. ‘यू ट्यूूब’वर या संदर्भात मजेशीर गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. हे सर्व रोखले पाहिजे. न्यायमूर्तींना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला. ते येथे डिजिटल पायाभूत सुविधांसंबंधी २ दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.

 सरन्यायाधीश पुढे म्हणाले की,

१. आजकाल बहुतांश उच्च न्यायालये ऑनलाईन सुनावणी करत आहेत. पाटणा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एका आय.ए.एस्. अधिकार्‍याला ‘नीट कपडे का घातले नाहीत ?’ असा प्रश्‍न केला होता. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अधिवक्त्यांना ‘तुम्ही या खटल्यासाठी सिद्ध का नाही ?’ असे विचारत होते.

२. न्यायमूर्तींनी १५ सहस्र पानांची कागदपत्रे वाचून न्याय दिला पाहिजे, अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकता ? म्हणूनच आपल्याला पेपरलेस (कागदपत्रांविना) आणि ऑनलाईन न्यायालय यांसारख्या डिजिटल पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.