मंदिराचे उत्पन्न ४० कोटी रुपयांवरून २४० कोटी रुपये झाले
धाराशिव – श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेट्यांच्या लिलावाची पद्धत बंद झाल्यापासून मागील १३ वर्षांत मंदिरातील रोख रक्कम आणि सोने-चांदी यांच्या स्वरूपातील उत्पन्न १० पटींनी वाढले आहे. वर्ष २०१० मध्ये मंदिराकडे भाविकांनी अर्पण केलेले २१ किलो सोने होते. यात मागील १३ वर्षांत १८७ किलोंची भर पडली असून मंदिराकडे आता २०८ किलो सोने आणि ३ सहस्र ४०४ किलो चांदी आहे. रोख रकमेचे दानही वाढले असून देणग्या आणि एकूण उत्पन्न यांमुळे मंदिराकडे २४० कोटी ९७ लाख ६० सहस्र रुपये जमा झाले आहेत. यासमवेतच पुरातन काळापासून राजे-महाराजे यांनी देवीला अर्पण केलेले ७ पेट्या भरून असलेले दुर्मिळ दागिने मंदिराकडे आहेत.
दिव्य मराठी विशेष:तुळजापुरात दानपेटी लिलाव बंदमुळे मंदिराची श्रीमंती 13 वर्षांत 10 पटीने वाढली; रक्कम 40 कोटींवरून 240 कोटी#tuljapurtemple #osmanabad #donation https://t.co/17hDBXaRpb
— Divya Marathi (@MarathiDivya) May 5, 2023
१. मागील १३ वर्षांपूर्वीपर्यंत मंदिरातील दागिन्यांच्या नोंदी आणि दानपेट्यांचे लिलाव यांत गैरप्रकार होत असल्याने मंदिर प्रशासन आणि धर्मादाय आयुक्त यांनी दानपेटीचा लिलाव बंद करून थेट मंदिराच्या माध्यमातून नियंत्रण चालू केले.
२. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा हिशोब लागत नसल्याने पुजारी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर गंगणे यांनी मंदिर आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी दानपेटी ‘सील’ करून दागिन्यांचा, तसेच अर्पण केलेल्या रकमेचा अंदाज घेतला. लिलावातून येणारी आणि दानपेटीत पडणारी रक्कम यांमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर येताच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दानपेटीचा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला.
३. वर्ष २०१०-११ मध्ये याच सिंहासन दानपेट्यांमध्ये ३ कोटी ५८ लाख ४६ सहस्र रुपये जमा झाले. वर्ष २०११-१२ मध्ये ५ कोटी ३ लाख ४० सहस्र रुपये, तर २०२२-२३ पर्यंत या दानपेटीमध्ये ११ कोटी ९६ सहस्र ९९० रुपये दान जमा झाले. अन्य दानपेट्यांमध्ये २०२२-२३ मध्ये ७ कोटी ७६ लाख ८ सहस्र रुपये जमा झाले आहेत.
४. वर्ष २०१० पूर्वी सिंहासन दानपेट्यांचा लिलाव करण्याची पद्धत होती. या दानपेटीत भाविकांनी वाहिलेली रक्कम ठेकेदाराला मिळत होती. वर्षातून एकदा हा लिलाव होत होता. वर्ष २००९-१० मध्ये शेवटचा लिलाव २ कोटी ३० लाख रुपयांना झाला होता.
हिंदु विधीज्ञ परिषदेने या संदर्भात प्रविष्ट केली होती याचिका !
महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणार्या श्री तुळजाभवानीमातेचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात असतांना तेथे वर्ष १९९१ ते वर्ष २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगांवकर यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. माननीय न्यायालयाने या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडीचा) चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला होता.
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या पाठपुराव्यामुळेच लिलाव बंद झाला. इतकेच नाही, तर त्यातील दोषींना शिक्षा होण्यासाठीही अद्याप हिंदु विधीज्ञ परिषदेचा पाठपुरावा चालू आहे.