प्रतिकार करणारा समाज उभा करणे, हे समर्थांना अभिप्रेत होते ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

पुणे येथील ‘शिवसमर्थ’ पुरस्कार आणि संकेतस्थळ लोकार्पण सोहळा

पुणे, २ मे (वार्ता.) – प्रेरणा, जीवन जगण्याचे कौशल्य शिकायचे असेल, जगण्याचे शास्त्र शिकायचे असेल, भक्ती-शक्ती कशी करावी ? हे जर शिकायचे असेल, तर समर्थांच्या वाङ्मयाला पर्याय नाही. छत्रपतींमुळे समर्थ रामदास किंवा समर्थांमुळे छत्रपती आहेत, असे नाही, हे दोघेही स्वयंभू आहेत, तरीही ते एक आहेत. त्यामुळे ‘कुणामुळे कोण ?’, असा वाद घालता कामा नये. शिव म्हणजे पावित्र्य, समर्थ म्हणजे शक्ती ! केवळ पावित्र्य, सामर्थ्य कामाचे नाही. हे दोघेही हवे. या दोघांचे एकत्रित रूप म्हणजे श्रीराम आहेत. कोदंड घेऊन प्रजेचे रक्षण करणे, हे श्रीरामांनी कर्तव्य मानले आहे. प्रभूंनी कधीही धनुष्याचा त्याग केला नाही. हाच प्रतिकार समर्थांनी शिकवला. प्रतिकारसंपन्न समाज उभा करणे, हे समर्थांना अभिप्रेत होते, तेच छत्रपतींना अभिप्रेत होते.गुन्हेगारी संपवायची असेल, तर गुन्हेगाराला ठार करावे लागते आणि हेच त्याच्यावरील कायमचे उत्तर आहे, असे मार्गदर्शन श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोशाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केले.

डावीकडून दादासाहेब यांच्या पत्नी सौ. प्रभावती जाधव, पू. बाळासाहेब स्वामी, पुरस्कार स्वीकारतांना दादासाहेब जाधव, प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, योगेशबुवा रामदासी

समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मराठवाड्यातील प्रख्यात शिवसमर्थ भक्त ‘श्री दादासाहेब जाधव’ यांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

हा कार्यक्रम पुणे येथील भरतनाट्य मंदिर येथे ३० एप्रिल या दिवशी पार पडला. या वेळी डॉ. पराग माणकीकर यांनी सिद्ध केलेले समर्थांच्या जीवनावरील, साहित्याची ओळख करून देणारे संकेतस्थळ आणि ‘अ‍ॅप’ याचे लोर्कापण स्वामींच्या हस्ते करण्यात आले. एका बाजूला छत्रपती शिवराय आणि दुसर्‍या बाजूला समर्थांची प्रतिमा असलेले ‘पु.ना. गाडगीळ’ यांनी सिद्ध केलेल्या चांदीच्या ‘श्री मुद्रे’चे लोर्कापणही करण्यात आले.

प.पू. स्वामी गोविंदगिरी महाराज मार्गदर्शन करतांना

प.पू. गोविंददेवगिरी महाराज पुढे म्हणाले की, संत, गुरुदेव हीच जीवनाची दिशा आहे. संत दाखवतील, त्या दिशेने गेल्यास आपले कल्याण होते. छत्रपतींचा, समर्थांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला तशा स्वरूपाचे नेतृत्व मिळालेले नाही, ही खंत आहे. ‘महाराष्ट्र धर्म’ असे सांगतांना महाराष्ट्राची संस्कृती, हिंदु संस्कृती अपेक्षित आहे. ज्या ज्या लोकांना ही संस्कृती नकोशी वाटते, असे महाराष्ट्रात आहेत. औरंगजेबाला ‘पापी’ न म्हणणारी माणसे महाराष्ट्रात आहेत, हे दुर्दैव आहे. औरंगाबादचे नामांतर झाले, तरी त्यांच्या पोटात गोळा येतो, इतके हे प्रेम आहे, ही शोकांतिका आहे. ‘श्रीरामाचे प्रतिदिन स्मरण करावे, भगवद्गीता प्रतिदिन आठवावी, शिव-समर्थांचे कार्य प्रतिदिन आठवावे आणि शिव-समर्थांनी जे कार्य केले, त्यानुसार अनुकरण करावे’, असे मला वाटते.

तरुण पिढीला सन्मार्गावर नेण्याचे सामर्थ्य समर्थ रामदासस्वामींच्या कार्यामध्ये आहे ! – श्री दादासाहेब जाधव, शिवसमर्थ भक्त

पुरस्कारप्राप्त दादासाहेब जाधव म्हणाले की, जीवनामध्ये सद्गुरु भेटले पाहिजेत, तरच आपल्या आयुष्याला दिशा मिळते. मला तरुणपणात गुरु भेटले. त्यांनी सांगितलेल्या मार्गांवर आजपर्यंत जीवन जगत आलो आहे. त्याचेच फळ म्हणजे हा मिळालेला ‘शिवसमर्थ’ पुरस्कार होय. आज मला जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान मिळत आहे. आजच्या महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक आहे. पुरोगामी विचारांनी महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे. तरुण पिढी व्यसनी, तसेच संस्कारहीन होत आहे. त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे सामर्थ्य हे रामदासस्वामींच्या कार्यामध्ये आहे. मनाच्या श्लोकांमध्ये आहे. शिवसमर्थ कार्याकरिता वेडे व्हा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले, तरी चालेल; पण अंतरंगातून समर्थांशी नाते जोडा.

समर्थ व्यासपीठातर्फे २०२३ सालच्या शिवसमर्थ पुरस्काराने सन्मानित श्री. दादासाहेब जाधव यांची मुलाखत –

(सौजन्य : Samarth Vyaspeeth (समर्थ व्यासपीठ))

तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात सापडलेला संदर्भ

समर्थ रामदासस्वामी सर्वांचेच गुरु आहेत ! – प.पू. गोविंददेव गिरि महाराज

तंजावरच्या पारंपरिक ग्रंथालयामध्ये छत्रपतींच्या वारसांनी नोंद केलेली आहे की, छत्रपतींचे गुरु रामदासस्वामी होते. आपल्या सर्वांचेही ते गुरु आहेत. त्याविषयी मनात शंका नाही.