सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवणार मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठक
मुंबई – ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला म्हणजेच १ आणि २ जूनला रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यशासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून साजरा केला जाणार आहे. हिंदवी स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख गडांवर शिववंदना, ‘जाणता राजा’ महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे, तसेच या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाविषयी आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते.
Shivrajyabhishek Sohala | 1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#Shivrajyabhishek_Sohala @Policenama1 @mieknathshinde
https://t.co/X3G2eQLkHK— Policenama (@Policenama1) April 29, 2023
या वेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
या सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ञ समितीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटलायझेशन (डिजिटलायझेशन म्हणजे कोणत्याही दस्तावेजांचे ‘इलेक्ट्रॉनिक छायाचित्र’) हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.
भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत. त्यासाठी देहली, दमण दीव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, कर्णावती (अहमदाबाद), गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा, अमृतसर, पणजी ही ठिकाणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.