गोवा : विवाहाला नकार दिला; म्हणून युवकाकडून मैत्रिणीचे अश्लील छायाचित्र प्रसारमाध्यमात प्रसारित

(प्रतिकात्मक चित्र)

म्हापसा, ३० एप्रिल (वार्ता.) – विवाहाला नकार दिला; म्हणून एका २५ वर्षीय युवकाने त्याच्या २१ वर्षीय मैत्रिणीचे अश्लील छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित केले. या संशयिताविरुद्ध पीडितेने तक्रार नोंदवताच संशयितावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार मूळ उत्तरप्रदेशमधील रहिवासी असलेल्या संशयिताने १ मासापूर्वी त्याच्या मैत्रिणीच्या भ्रमणभाषवरून एक व्हॉट्सॲप गट सिद्ध केला होता आणि या गटात पीडितेचे कुटुंब सदस्य, तसेच इतर बाहेरील काही लोक यांना समाविष्ट केले होते. पीडितेने विवाहाला नकार दिल्यानंतर संशयिताने याच गटावर पीडितेचे अश्लील छायाचित्र प्रसारित केले. यानंतर पीडितेने २९ एप्रिल या दिवशी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असता पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(अ) आणि ५००, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

नैतिकतेची शिकवण नसल्याने समाजात सामाजिक माध्यमांचा कशा प्रकारे वापर केला जातो, याचे हे आहे उदाहरण ! त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या समवेत समाजाला धर्माचे शिक्षण देणे म्हणजेच साधना शिकवणे किती अपरिहार्य झाले आहे, ते लक्षात येते.