काँग्रेस आणि विषारी साप !

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे घोंगावत आहेत. निवडणुका म्हटले की, तेथे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात, हे नेहमीचेच चित्र सर्वांना पहायला मिळते; मात्र हे आरोप करतांना काही राजकीय नेत्यांकडून ताळतंत्र सोडून इतर पक्षांतील नेत्यांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना ‘विषारी सापा’शी केली. ‘मोदी विषारी सापासारखे आहेत, ते विषारी नाहीत, असे तुम्हाला वाटत नसेल, तर त्यांना स्पर्श करून बघा. त्यांना स्पर्श केला, तर तुम्ही मरून जाल’, असे अकलेचे तारे त्यांनी तोडले.

बोलतांना जीभ घसरण्याची खरगे आणि काँग्रेसचे नेते यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांच्याविषयी बोलतांना सोनिया गांधी यांच्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत बहुतांश काँग्रेस नेत्यांची जीभ आणि पातळी घसरली आहे. सोनिया गांधी यांनी याआधी मोदी यांचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ असा केला होता. त्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांनी मोदींविषयी ‘चौकीदार चोर है’, असे म्हटले होते. मोदी आडनावावरून केलेल्या टीकेमुळे राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तसेच त्यांना त्यांचे लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले आहे. परिणामी खासदार म्हणून देहलीच्या ‘ल्युटियन्स झोन’मध्ये मिळालेल्या बंगल्यावरही त्यांना पाणी सोडावे लागले. तरीही राहुल गांधी असो कि खरगे यांना शहाणपण येत नाही, हे दुर्दैव आहे.

मोदीद्वेषाने पछाडलेले काँग्रेसवाले !

मल्लिकार्जुन खरगे यांची ‘प्रगल्भ आणि संयमित राजकारणी’ अशी प्रतिमा आहे; पण काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनाही गांधी घराण्याप्रमाणे मोदीद्वेषाने पछाडले आहे. ‘राजकारणात काय बोलावे ?, यापेक्षा काय बोलू नये, हे ज्याला समजते, तो यशस्वी होतो’, असे म्हणतात; पण याविषयी काँग्रेसच्या नेत्यांची उलट स्थिती आहे. ‘मी चुकीचे बोललो’ याची जाणीव झाल्यावर खरगे यांनी नेहमीप्रमाणे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘मला तसे म्हणायचे नव्हते. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला’, असा ठराविक साच्याचा खुलासा करत जरतरच्या भाषेत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. ‘भाजप सापासारखा आहे. त्याची विचारधारा विषारी आहे. या विचारधारेचे समर्थन केले, तर तुमचा मृत्यू निश्चित आहे’, असे मला म्हणायचे होते. मोदी यांच्याविषयी मी काहीही बोललो नाही, मी व्यक्तीगत टीका कधीच करत नाही’, असे म्हणायलाही ते विसरले नाहीत.

तथापि खरगे यांनी प्रत्यक्ष नाव घेऊनच हे विधान केल्याचे वृत्त प्रत्येक वृत्तवाहिनी आणि सामाजिक माध्यमे यांवरही प्रसारित झाले आहे. तोंडातून निघालेला शब्द आणि भात्यातून निघालेला बाण कधी परत घेता येत नाही. त्यामुळे नंतर तुम्ही कितीही पश्चातबुद्धीचे प्रदर्शन केले, तरी तोपर्यंत तुमची व्हायची ती हानी होऊन जाते. त्यामुळे ‘बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला’, असे नेहमीच म्हटले जाते.

खरगे यांच्यावर काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे दायित्व सोपवण्यात आले आहे; मात्र त्यांनी असे विधान केल्यावर ‘काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल होईल कि ती रसातळाला जाईल ?’, हा विचार काँग्रेसच्या नेत्यांनी करण्याची वेळ आली आहे, तसेच खरगे यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अशी विधाने करणे त्यांना शोभते का ? खरगे जे बोलले ती त्यांची भाषा नाही, गांधी घराण्याची भाषा ते बोलले. काँग्रेसमध्ये गांधी घराण्यासमोर लाळघोटेपणा करण्याची तिच्या नेत्यांमध्ये स्पर्धा चालू असते, त्यात आता खरगे यांची भर पडली आहे. टीका करतांनाही व्यक्तिगत टीका टाळली पाहिजे, ती सूत्रांवर आधारित टीका केली पाहिजे, तर लोकही अशा विधायक टीकेचे स्वागत करतात. खरगे आणि अन्य काँग्रेसी नेते यांनी आतापर्यंत वापरलेली भाषा ही ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या प्रकारची आहे.

काँग्रेसने शहाणे व्हावे !

काँग्रेस

आतापर्यंत जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाने मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली, तेव्हा लाभ नाही, तर काँग्रेसची कधीही भरून न निघणारी हानीच झाली आहे, हा इतिहास आहे. मोदी यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषत: गांधी घराण्याने केलेल्या टीकेमुळे उलट मोदी यांचाच राजकीय लाभ झाला; कारण मोदींवर केलेली टीका देशातील जनता खपवून घेत नाही. मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात काश्मीरमधील ३७० कलम हटवले, देशाची संरक्षण सिद्धता भक्कम केली, इतर देशांशी चांगले संबंध ठेवून देशाची अर्थव्यवस्था बळकट करून देशाच्या विकासाचा दर उंचावला. देशातील अनेक दुर्गम भागांत वीज आणि गॅस जोडणी लोकांना उपलब्ध करून दिली, शेतकर्‍यांसाठी अनेक योजना चालू केल्या, देशात सर्व ठिकाणी दर्जेदार रस्ते बनवल्याने देशाच्या विकासाला चालना मिळाली. ‘मोदी यांनी देशाला कसे विकासाच्या मार्गावर नेले ?’, ‘जगात भारताची प्रतिष्ठा कशी उंचावली ?’, याकडे काँग्रेसचे नेते ‘धृतराष्ट्र गांधारी’वृत्तीप्रमाणे पहात असले, तरी देशातील लोकांना ते दिसत आहे. स्वत:च्या ६० वर्षांच्या शासनकाळात काँग्रेसने विशेषत: नेहरू-गांधी घराण्याने भ्रष्टाचार, मुसलमानांचा उदोउदो आणि त्यांचे लांगूलचालन करून देशाचा कसा बट्ट्याबोळ केला, हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. काँग्रेसने देशाची केलेली अधोगती ही विषारी सापाहून अधिक धोकादायक आणि भयानक आहे. देशातील जनतेला ते दिसते आहे. त्यामुळे आतातरी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांच्यावर टीका करू नये. भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसची आतापर्यंत जेवढी हानी केली नाही, त्याहून अधिक हानी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या हातांनी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी किंवा भाजपचे अन्य नेते यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी देशाच्या विकासकार्यात हातभार लावावा, अन्यथा जनता त्यांचे राजकीय अस्तित्व संपवेल, हे निश्चित !

पंतप्रधान मोदी यांच्यावर अश्लाघ्य टीका करणार्‍या काँग्रेसवाल्यांचे राजकीय अस्तित्व जनता संपवेल, हे निश्चित !