राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २६ एप्रिल (वार्ता.) – पूर्वप्राथमिक ते उच्चशिक्षणापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल, असे आश्वासक उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे काढले. रवींद्र भवन, सांखळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘निपुण भारत शिक्षा संकल्प’ कार्यक्रमात ते बोलत होते. ‘निपुण भारत शिक्षा संकल्प’ ही शिक्षण खात्याच्या अंतर्गत गोवा समग्र शिक्षा यांनी राबवलेली एक जागृती मोहीम आहे.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘गुरुकुल विश्व ॲप’चे लोकार्पण केले. या ॲपमुळे पूर्वप्राथमिक शाळांची नोंदणी करणे सुविधाजनक होणार आहे. हे ॲप इन्फोटॅक मंडळ गोवा यांनी विकसित केले आहे. या ॲपमुळे सरकारला ऑनलाईन नोंदणीद्वारे पूर्वप्राथमिक शाळांना अनुमती देणे सहज शक्य होणार आहे.

मुख्यमत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम असण्याचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यात शिक्षकांची असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांनी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची सर्वांगीण वाढ आणि विकास साधला जावा अन् उच्च शिक्षणासाठी दर्जेदार शिक्षण दिले जावे, असे सांगितले. शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी गोव्यात सध्या ६२७ पूर्वप्राथमिक शाळा आणि १ सहस्र २६२ अंगणवाड्या असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमांतर्गत ‘निपुण भारत’ कार्यक्रमाविषयी जागृतीविषयी उत्तर गोव्यातील शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.