जपानच्या ‘लँडर’ची चंद्रावर उतरण्याची मोहीम अपयशी !

(‘लँडर’ म्हणजे ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी बनवण्यात आलेले अवकाशयान)

टोकियो (जपान) – जपानला भारताच्या ‘विक्रम लँडर’सारख्या अपघाताला तोंड द्यावे लागले आहे. त्याच्या ‘हाकुतो-आर् मिशन १’ नावाच्या ‘लँडर’ला चंद्राच्या भूमीवर उतरवण्याची मोहीम अपयशी ठरली आहे. लँडर चंद्राच्या भूमीवर कोसळून (‘क्रॅश लँडिंग’ होऊन) त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला. जपानचे खासगी आस्थापन ‘आयस्पेस इंक’ने ही मोहीम हाती घेतली होती. जर ही मोहीम यशस्वी झाली असती, तर खासगी आस्थापनाकडून अशी मोहीम केल्याचा विक्रम झाला असता.

१. गेल्या वर्षी डिसेंबर मासात जपानचे हे लँडर अमेरिकेच्या फ्लॉरिडा येथील ‘केप केनवरल’मधून ‘स्पेस एक्स’च्या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आले होते.

२. याआधी भारत आणि इस्रायल या देशांनीही अशा मोहिमा हाती घेतल्या होत्या; परंतु त्यांना अपयश आले होते.

३. आतापर्यंत केवळ सोविएत संघ, अमेरिका आणि चीन याच देशांना त्यांच्या उपग्रहांना चंद्रावर उतरवण्यात यश प्राप्त करता आले आहे.

४. जपानच्या ‘आयस्पेस इंक’ने वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर माणसांची एक कॉलनी बनवण्याचे नियोजन आखले आहे.