बालपणापासून खडतर जीवन जगलेल्‍या सनातनच्‍या ६४ व्‍या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचे जीवन बालपणापासूनच खडतर होते. त्‍यांनी अनेक त्रास सहन करून मुलींना वाढवले. हे खडतर जीवन जगत असतांना त्‍यांनी त्‍याविषयी एकदाही देवाकडे गार्‍हाणे केले नाही. त्‍यांनी आहे ती परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारली. उतारवयात त्‍यांचा संपर्क सनातनच्‍या साधकांशी झाला आणि त्‍यांनी नामजपाला आरंभ केला. त्‍यानंतर त्‍यांचा नामजप अखंड होऊ लागला. नंतर त्‍या संतपदी विराजमान झाल्‍या.

पू. आजींचा साधनाप्रवास येथेे दिला आहे. २५.४.२०२३ या दिवशी या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. 

(भाग ३)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/676664.html
पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी

२१. सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना

२१ अ. सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना समजल्‍यावर प्रथम नामजप करता न येणे; मात्र नंतर ५ – ६ घंटे आणि त्‍यानंतर सतत नामजप करणे : ‘माझ्‍या मोठ्या मुलाला (श्री. रामेश्‍वर भुकन याला) एका साधकाच्‍या माध्‍यमातून सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना समजल्‍यावर त्‍याने पू. आईंना नामजप करण्‍यास सांगितले. पू. आईंना कुठलाही नामजप करता येत नव्‍हता; म्‍हणून त्‍यांना ‘तुम्‍ही केवळ ‘कृष्‍ण, कृष्‍ण’, असेच म्‍हणा’, असे सांगितले होते. आरंभी त्‍यांचे नामजपात लक्ष लागत नसे; परंतु रामेश्‍वर त्‍यांना परत परत जप करण्‍यास बसवायचा. मग त्‍या प्रतिदिनच जप करू लागल्‍या. त्‍या प्रारंभी २ – ३ घंटे नामजप करायच्‍या. नंतर त्‍या ५ – ६ घंटे नामजप करू लागल्‍या. त्‍या पुष्‍कळ तळमळीने नामजप करायच्‍या. त्‍यानंतर त्‍या सततच नामजप करू लागल्‍या.

२१ आ. परेच्‍छेने वागणे आणि निरपेक्षभावात रहाणे : त्‍यांनी सर्वांचे करूनही कशातच मन अडकवले नाही. त्‍या पुष्‍कळ निरपेक्ष राहिल्‍या. त्‍या घरातील सर्वांचे ऐकायच्‍या आणि त्‍याप्रमाणे करून सतत परेच्‍छेने वागायच्‍या. त्‍यांचा कधीच कशासाठी हट्ट नसायचा किंवा त्‍यांना कुठलीच अपेक्षा नसायची. त्‍यांनी त्‍यांच्‍या जवळील सर्व पैसे मुलींच्‍या संसारासाठी वापरले; परंतु त्‍यांना कधीच असे वाटले नाही की, मुलींनी आणि नातवंडांनी मला पैसे द्यावे किंवा दागिने करावे.

श्रीमती इंदुबाई भुकन

२१ इ. काही अडचणींमुळे रामनाथी आश्रमात जाता न आल्‍याने ‘स्‍वतःचा नामजप अल्‍प पडत असेल; म्‍हणून अनुमती मिळाली नाही’, असा विचार मनात येऊन खंत वाटणे : मी, माझा मोठा मुलगा (श्री. रामेश्‍वर भुकन), सून (सौ. उर्मिला भुकन) आणि माझी नात (कु. वेदश्री भुकन, आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ९ वर्षे) हे पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी काही दिवस रामनाथी आश्रमात राहिलो. तेव्‍हा पू. आई माझी मुलगी सौ. सीमा अनारसे हिच्‍याकडे रहात होत्‍या. तेथेसुद्धा त्‍या पहाटे उठून दिवसभर जप करायच्‍या आणि देवाशी बोलायच्‍या. त्‍यांच्‍या मनात सतत नामजपच असायचा. असे तीन मास गेले. आम्‍ही सर्व जण आश्रमातून आल्‍यावर त्‍या परत आमच्‍या समवेत रहात होत्‍या. त्‍यानंतर गावाकडील सर्व कामे करून आम्‍ही पुन्‍हा पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी आश्रमात येतांना त्‍यांना घेऊन येण्‍याचे ठरले; परंतु आश्रमात त्‍यांना आणण्‍याविषयी व्‍यवस्‍थित समन्‍वय न झाल्‍याने त्‍यांना रेल्‍वेस्‍थानकावरून नातीच्‍या समवेत परत माघारी जावे लागले. त्‍या वेळी त्‍यांना पुष्‍कळ वाईट वाटले की, माझा नामजप अल्‍प पडला; म्‍हणून देवाने मला आश्रमात यायला अनुमती दिली नाही.

२१ ई. तळमळीने नामजप वाढवल्‍यावर आश्रमात येण्‍याची संधी मिळणे आणि आश्रमातील काही साधकांना ‘पू. आई संत आहेत’, असे जाणवणे : त्‍यानंतर त्‍यांनी पुष्‍कळ नामजप करण्‍यास आरंभ केला. त्‍या तळमळीने जप करायच्‍या. त्‍यांच्‍या या तळमळीने त्‍यांना एकाच मासात आश्रमात येण्‍याची अनुमती मिळाली.

श्री. रामेश्‍वर गावी जाऊन त्‍यांना आश्रमात घेऊन आला. जानेवारी २०१७ मध्‍ये पू. आई प्रथम रामनाथी आश्रमात आल्‍या. त्‍या वेळी आश्रम पाहून त्‍यांचा भाव जागृत झाला. त्‍यांना पाहून आश्रमातील काही साधकांना ‘त्‍या संतच आहेत’, असे वाटायचे.

२२. संतपद

२२ अ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पू. आई साधनेत पुढे गेल्‍या आहेत’, असे सांगणे आणि त्‍यानंतर १५ दिवसांनी त्‍यांना संत म्‍हणून घोषित करण्‍यात येणे : पू. आई आश्रमात आल्‍यावर १५ दिवसांनी त्‍यांना पाहून गुरुदेव (परात्‍पर गुरू डॉ. आठवले) म्‍हणाले, ‘‘या साधनेत पुढे गेल्‍या आहेत.’’ त्‍यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी आश्रमात त्‍यांचा ‘संत’ म्‍हणून सन्‍मान-सोहळा झाला आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्‍यांना ‘संत’ म्‍हणून घोषित केले.

पू. आई आश्रमात आल्‍यावर त्‍या आश्रमजीवनाशी एकदम समरस झाल्‍या.

२२ आ. त्‍या देवाशी पुष्‍कळ आर्ततेने बोलतात. त्‍यांचे देवाशी बोलणे ऐकून असे वाटते की, त्‍यांचे बोलणे देवापर्यंत पोेचते.

२२ इ. पू. आईंचा तुळशीप्रतीचा भाव ! : पू. आई तरुण वयापासून नियमितपणे तुळशीला पाणी घालणे, उदबत्ती लावणे, हळदी-कुंकू लावणे, भावपूर्ण नमस्‍कार करणे, असे करायच्‍या. आता वयोमानानुसार त्‍यांना अधिक चालता येत नाही, तरीसुद्धा त्‍या इतरांकडून तुळशीला पाणी घालून घेतात.

२२ ई. नामजप आणि भावपूर्ण प्रार्थना करणे : पू. आई वयाच्‍या ९८ व्‍या वर्षी ४ – ५ घंटे बसून जप करतात. त्‍या समष्‍टीसाठी जप करतात आणि गुरुमाऊली, सद़्‍गुरु अन् संत यांना नियमित प्रार्थना करतात. त्‍या देवाला प्रार्थना करतात, ‘देवा, सर्व साधकांना बळ दे. सर्वांचे चांगले होऊ दे. सर्व साधक सुखी राहू देत’; तसेच ‘गुरुदेवांना आयुष्‍य मिळू दे, रामराज्‍य लवकर येऊ दे’, अशा प्रार्थना त्‍या अधूनमधून करतात.

२२ उ. पू. आईंची साधकांवरील प्रीती ! : त्‍यांचे सर्व साधकांवर पुष्‍कळ प्रेम आहे. कुणी साधक त्‍यांना भेटायला आला, तर पू. आई त्‍या साधकाशी प्रेमाने बोलतात, तसेच त्‍याची विचारपूस करतात. पू. आई साधकाचा चेहरा, डोके आणि पाठ यांवरून प्रेमाने हात फिरवतात अन् त्‍याला प्रसाद देतात. साधकांना पाहून त्‍यांना पुष्‍कळ आनंद वाटतो.

२२ ऊ. संतपदी विराजमान झाल्‍यानंतर पू. आईंना आलेल्‍या अनुभूती

२२ ऊ १. वेगवेगळ्‍या देवतांनी पू. आईंच्‍या समोर प्रगट होऊन त्‍यांना दर्शन देणे

अ. पू. आई नामजपाला बसल्‍यावर श्री गणपति, श्री दुर्गादेवी, महादेव या देवतांची रूपे त्‍यांच्‍या समोर प्रगट व्‍हायची. देवता लहान बालकाच्‍या रूपात प्रगट होऊन त्‍यांना दर्शन द्यायचे.

आ. वर्ष २०२१ मधील महाशिवरात्रीच्‍या दिवशी त्‍या नामजप करत असतांना त्‍यांना ‘हातात त्रिशूळ, गळ्‍यात नागदेवता आणि रुद्राक्षांच्‍या माळा, डोक्‍यावर जटा अन् हातात कमंडलू’, अशा रूपात प्रगट होऊन साक्षात् भगवान शिवाने दर्शन दिले. तेव्‍हा त्‍यांची पुष्‍कळ भावजागृती झाली. त्‍या वेळी त्‍या वेगळ्‍याच आनंदात होत्‍या.

इ. पू. आईंच्‍या गावी (मांडवगण, महाराष्‍ट्र) येथे भगवान शिवाचे श्री सिद्धेश्‍वर नावाचे ग्रामदैवत आहे. पू. आईंची भगवान शिवावर पुष्‍कळ श्रद्धा असल्‍याने श्री सिद्धेश्‍वर त्‍यांना शिवाच्‍या रूपात दर्शन द्यायचा.

२२ ऊ २. स्‍वप्‍नात सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन होणे : पू. आईंना स्‍वप्‍नात अनेक वेळा सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन व्‍हायचे. गुरुदेव त्‍यांच्‍याशी सूक्ष्मातून बोलायचे. त्‍यानंतर त्‍या पुष्‍कळच आनंदी दिसायच्‍या. ते चैतन्‍य आम्‍हालासुद्धा मिळायचे.

२३. अर्धांगवायूचा झटका आल्‍यावर पू. आईंच्‍या शरिराची डावी बाजू निकामी होणे आणि ‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले उपाय, पू. आईंचा देवाप्रतीचा भाव अन् नियमित तेलाने मर्दन’, हे सर्व केल्‍यावर पू. आई बर्‍या होणे

पू. आईंना वयाच्‍या ८६ व्‍या वर्षी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या शरिराची डावी बाजू निकामी झाली होती. त्‍यांना बसतासुद्धा येत नव्‍हते. त्‍यांना उपचारासाठी रुग्‍णालयात नेल्‍यावर ‘त्‍यांचे वय पुष्‍कळ आहे. आम्‍ही काही उपचार करू शकत नाही. तुम्‍ही त्‍यांना परत घरी घेऊन जा’, असे आधुनिक वैद्यांनी सांगून काहीच उपचार न करता त्‍यांना घरी पाठवून दिले. घरी आल्‍यावर सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय चालू केले. नियमितचा जप, पू. आईंचा देवाप्रतीचा भाव, श्रद्धा आणि नियमित तेलाने मर्दन असे सातत्‍याने ६ मास केल्‍यावर पू. आई या आजारपणातून बर्‍या झाल्‍या आणि चालू-फिरू लागल्‍या.

२४. अनुभूती

आजारपणात देवीने स्‍वप्‍नात येऊन पू. आईंच्‍या पायावरून हात फिरवणे आणि त्‍यानंतर त्‍यांच्‍या पायाची हालचाल चालू होऊन त्‍यांना चालता येणे : आजारपणात त्‍या देवाशी पुष्‍कळ बोलायच्‍या. त्‍या देवाला शरण जाऊन प्रार्थना करायच्‍या. एकदा त्‍यांच्‍या स्‍वप्‍नात देवी आली आणि देवीने त्‍यांच्‍या पायावरून हात फिरवला. त्‍यानंतर त्‍यांच्‍या पायाची हालचाल चालू झाली आणि नंतर त्‍यांना थोडे चालता येऊ लागले.

४ मास झोपून असलेल्‍या पू. आई उठून बसल्‍या. देवीनेच स्‍वप्‍नात येऊन त्‍यांना बरे केले.’

– श्रीमती इंदुबाई भुकन (पू. लोखंडेआजींची मुलगी, आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०२२)

(समाप्‍त)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक