स्‍वच्‍छ आणि सुंदर शहर स्‍पर्धेत महाबळेश्‍वर (जिल्‍हा सातारा) नगरपालिका राज्‍यात दुसरी !

पल्लवी पाटील यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार स्‍वीकारला. या वेळी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री, विविध खात्‍यांचे अधिकारी

सातारा, २४ एप्रिल (वार्ता.) – महाराष्‍ट्र शासन आयोजित शहर सौंदर्यीकरण आणि स्‍वच्‍छता स्‍पर्धा २०२२ चा निकाल घोषित करण्‍यात आला. यामध्‍ये जिल्‍ह्यातील महाबळेश्‍वर गिरीस्‍थान नगरपालिकेने राज्‍यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात महाबळेश्‍वर गिरीस्‍थान नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकारी पल्लवी पाटील यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार स्‍वीकारला. या वेळी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री, विविध खात्‍यांचे अधिकारी आणि नागरिक उपस्‍थित होते.

राज्‍यातील शहरे सुंदर आणि स्‍वच्‍छ दिसावीत, या संकल्‍पनेतून शासनाच्‍या वतीने सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये एक शासन निर्णय पारित करण्‍यात आला. या अंतर्गत राज्‍यात स्‍पर्धा राबवण्‍यात आल्‍या. यामध्‍ये महाबळेश्‍वर पालिकेने सहभाग नोंदवला. या स्‍पर्धेत पालिकेने सक्रिय सहभाग घेत शहरातील निसर्गवैभव, प्रेक्षणीय स्‍थळे, हेरिटेज वास्‍तू, बाजारपेठ या कामांचे सादरीकरण केले.

महाबळेश्‍वर येथील नागरिकांचे सहकार्य, सकारात्‍मक प्रतिसाद, तसेच पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍या कार्यकुशलतेमुळे शहर सौंदर्यीकरण अन् स्‍वच्‍छतेसाठी प्रोत्‍साहन मिळाले. ज्‍यायोगे शहरात विविध उपक्रम राबवता आले. त्‍यामुळे महाबळेश्‍वर गिरीस्‍थान नगरपालिकेला राज्‍यात दुसरा क्रमांक पटकावता आला. – पल्लवी पाटील, मुख्‍याधिकारी तथा प्रशासक, महाबळेश्‍वर गिरीस्‍थान नगरपालिका