मॉरिशस येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण !

प्रतिमात्मक छायाचित्र

मुंबई – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मॉरिशस येथे लोकार्पण करण्यात येणार आहे. २८ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

मॉरिशस देशात ७५ सहस्र मराठी बांधव आहेत. त्यांनी मॉरिशस येथे राहूनही मराठी संस्कृती जोपासली आहे. तेथे मराठी बांधवांच्या ५४ संघटना कार्यरत आहेत. या सर्व संघटनांनी मिळून वर्ष १९६० मध्ये स्थापन केलेल्या ‘मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसराच्या येथील पुढील कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून ८ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ‘मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन’च्या वतीने मॉरिशस येथे शिवजयंती, महाराष्ट्रदिन, गुढीपाडवा, गणेशचतुर्थी आदी उत्सव साजरे केले जातात. मॉरिशस येथे महाराष्ट्र भवनसुद्धा उभारण्यात आले आहे.