पोलीस कर्मचार्‍यांनी सेवेत राजकीय दबावाचा वापर करू नये ! – गोवा पोलीस मुख्यालयाची परिपत्रकाद्वारे चेतावणी

पणजी, २३ एप्रिल (वार्ता.) – पोलीस दलातील काही कर्मचारी पोलीस सेवा बजावतांना स्वतःच्या मर्जीनुसार व्हावे, यासाठी सातत्याने राजकीय दबाव आणत असतात. पोलीस कर्मचार्‍यांची ही कृती यापुढे सहन केली जाणार नाही. यापुढे पोलीस खात्याचे काम बाह्य हस्तक्षेपामुळे प्रभावित होणार नाही. पोलीस कर्मचार्‍यांना काही तक्रार असल्यास किंवा त्यांचे काही प्रस्ताव असल्यास त्यांनी ते त्यांच्या वरिष्ठांच्या माध्यमातून मांडले पाहिजेत. पोलीस मुख्यालयातून एका परिपत्रकाच्या माध्यमातून पोलीस दलाच्या कर्मचार्‍यांना ही चेतावणी देण्यात आली आहे.

पोलीस परिपत्रकात पुढे म्हटले आहे की,

एखादा पोलीस कर्मचारी तक्रार मांडण्यासंबंधी प्रस्तावित कार्यपद्धतींचे पालन न करता थेट राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. काही पोलीस कर्मचारी त्यांच्या विरोधात चालू असलेले अन्वेषण, खात्यांतर्गत बढती किंवा स्थानांतर यांसाठी राजकीय दबावाचा वापर करतात आणि यामुळे त्याचे वरिष्ठ निराश होतात. काही पोलीस कर्मचारी राजकीय दबावाचा वापर करून अनेक वर्षे एकाच ठिकाणी सेवा बजावत आहेत, तर काही जण स्थानांतराचा आदेश काढूनही नवीन ठिकाणी सेवेला रूजू झालेले नाहीत. पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या तक्रारी किंवा प्रस्ताव थेट वरिष्ठांकडे मांडणे हे ‘रूल २० ऑफ ‘सी.सी.एस्.’ कंडक्ट रूल्स १९६४’ चे उल्लंघन आहे.

संपादकीय भूमिका

राजकीय दबावाचा वापर करणारे पोलीस गुन्ह्यांचे अन्वेषण योग्यरित्या करत असतील का ?