‘जी-२०’ शिखर परिषद : विकासात्मक कार्यगटाच्या तिसर्‍या बैठकीचे गोव्याला वेध

पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या आरोग्य कार्यगटाची  १७ ते १९ एप्रिल या कालावधीतील बैठक यशस्वी झाल्यानंतर गोव्याला आता ९ ते ११ मे या कालावधीत गोव्यात होणार्‍या तिसर्‍या विकासात्मक कार्यगटाच्या बैठकीचे वेध लागले आहेत. या बैठकीत ‘डिजिटल प्रिन्सिपल्स’, ‘ग्रीन ट्रान्झीशन्स’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयक अन् सहयोग वाढवणे या दीर्घकालीन विकासात्मक सूत्रांवर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. ‘जी-२०’ शिखर परिषदेतील विकासात्मक कार्यगटाची पहिली बैठक मुंबई येथे १३ ते १६ डिसेंबर २०२२ आणि दुसरी बैठक ९ एप्रिल २०२३ या दिवशी कुमाराकोम, केरळ येथे झाली. या बैठकांद्वारे जगभरातील विकसनशील आणि विकसित राष्ट्रे एकत्र येऊन जागतिक स्तरावर दीर्घकालीन विकासाला येणार्‍या अडथळ्यांवर उपाययोजना काढत आहेत.

गोव्याच्या आदरातिथ्याचे प्रतिनिधींकडून कौतुक ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘जी-२०’ शिखर परिषदेत सहभागी झालेले विदेशी प्रतिनिधी त्यांना दिलेल्या आदरातिथ्याने भारावून गेले आहेत. विदेशी प्रतिनिधींनी राज्याचे कौतुक केले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आरोग्य कार्यगटाच्या ३ दिवसांच्या बैठकीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि राज्यमंत्री डॉ. भारती पवार गोव्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘या बैठकीत आरोग्यविषयक अनेक विषय चर्चेत आले. ‘डिजिटल हेल्थ’ या पूर्वबैठकीस मी उपस्थित होतो. ही बैठक आम्ही यशस्वीरित्या आयोजित करू शकलो.’’

(सौजन्य : OHeraldo Goa) 

‘जी-२०’ शिखर परिषदेच्याआरोग्य कार्यगटाच्या बैठकीत सहभागी प्रतिनिधी पाहुणचाराने भारावले

गोव्यात ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीत भारतासह १९ देशांतून आलेले १८० प्रतिनिधी सहभागी झाले होते. विविध देशांतील प्रतिनिधींनी या बैठकीत त्यांचे कौशल्य आणि ज्ञान याचे सादरीकरण करण्यासह त्यांचे अनुभवही सांगितले. बैठकीसाठी सौदी अरेबिया येथून आलेले डॉ. कमल अल्थोबैती यांनी गोव्याची संस्कृती आणि नृत्य पाहून भारावून गेल्याचे सांगितले, तर बैठकीत सहभागी झालेले अमेरिकेचे प्रतिनिधी थेरेझा मॅथीव यांनी गोव्याचे सौंदर्य आवडल्याचे म्हटले. बैठकीत सहभागी झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधी स्टेफॅनी सेडॉक्स म्हणाल्या, ‘‘आम्हाला गोव्याचा पाहुणचार, संस्कृती, संगीत आणि नृत्य आवडले.’’