चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे शासकीय कार्यालयाकडून खासगी हॉटेल व्यावसायिकाला पाणीपुरवठा !

जळगाव – जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील जिल्हा परिषद जलसंधारण कार्यालयाकडून गेल्या अनेक वर्षांपासून एका खासगी हॉटेल व्यावसायिकाला पाणीपुरवठा केला जात होता. ही गोष्ट नगरपालिकेने अतिक्रमण हटवल्यावर समजली. शासकीय कार्यालयाला पाण्याची कमतरता पडू नये; म्हणून शासनाच्या वतीने पाणी पाईपलाईन घेऊन संबंधित कार्यालयाला पाणीपुरवठा केला जातो; मात्र चाळीसगाव शहरातील जलसंधारण कार्यालयाकडून आर्थिक लाभासाठी गेल्या काही वर्षांपासून खासगी चहाच्या हॉटेल व्यावसायिकाला त्यांच्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जात होता. या प्रकरणी ‘शासनाची फसवणूक करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी’, अशी जनतेची मागणी आहे. (भ्रष्ट अधिकार्‍यांकडून रक्कम वसूल करा. ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !