भारतातील आरोग्य सुविधा उत्कृष्ट ! –  जी-२० च्या प्रतिनिधी डॉ. कॅरीन कॅलींडर

नावेली आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर दिली माहिती

जी-२० परिषदेच्या आरोग्यविषयक गटाने नावेलीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेली भेट
(चित्र सौजन्य – navhindtimes)

मडगाव – गोव्यासह भारतातील सार्वजनिक आरोग्य सुविधा उत्कृष्ट असून इतर देशांच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रात भारताने पुष्कळ प्रगती केली आहे. सुधारणा करण्यासाठीही पुष्कळ वाव असून आधुनिक सुविधा, तंत्रज्ञानाचा समावेश करतांनाच डाटा नियंत्रित करण्यासाठी पालटत्या काळानुसार नव्या गोष्टी समाविष्ट करणे शक्य आहे, असे जी-२० परिषदेच्या आरोग्यविषयक गटाच्या ‘युनिसेफ’च्या डॉ. कॅरीन कॅलींडर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

पणजी येथे चालू असलेल्या जी-२० परिषदेच्या बैठकीत सहभागी झालेल्या आरोग्यविषयक गटाने २० एप्रिल या दिवशी नावेलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यविषयक सुविधांची माहिती घेतली. या वेळी डॉ. कॅरीन कॅलींडर पत्रकारांशी बोलल्या. ‘ऑनलाईन साहाय्यक परिचारिका – दाई सुविधे’ची (ए.एन्.एम्.ओएल् – ऑक्सिलरी नर्स अँड मिडवाईफ ऑनलाईन) संपूर्ण माहिती जी-२० च्या गटाने या भेटीत घेतली. या भेटीत विदेशी प्रतिनिधींचा सहभाग अधिक होता. या वेळी त्यांनी नावेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, आरोग्य सेवा यांची पहाणी करून माहिती घेतली.

(सौजन्य : Goa 365 TV) 

डाॅ. कॅलींडर पुढे म्हणाल्या की,

१. भारतातील सार्वजनिक आरोग्य पद्धत प्रभावी असून ती पद्धत आणि सुविधा पाहून मी प्रभावित झाले आहे. भारत देशात ‘ए.एन्.एम्.ओएल्’ कर्मचारी महिला, शिशु आणि मुलांचे आरोग्य अन् त्यांची निकोप वाढ यांसाठी देत असलेले महत्त्व, घेत असलेली काळजी पाहून मी प्रभावित झाले. ‘डिजिटल टूल्स’चा करण्यात येत असलेला वापर पाहूनही प्रभावित झाले. सार्वजनिक आरोग्य सुविधा वाढवण्यासंदर्भात भारताकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.

२. या संदर्भात अधिक माहिती देतांना ‘युनिसेफ’चे देहलीतील प्रतिनिधी तथा आरोग्य तज्ञ डॉ. अजय ट्राकरू यांनी सांगितले की, ‘ए.एन्.एम्.ओएल्’द्वारे भारतात महिला, शिशु, बालक यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जात असून गर्भवती महिला, शिशु आणि बालक यांच्या आरोग्याची काळजी घेणे अन् औषधे पुरवणे यांसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी एक ‘डिजिटल टूल’ही असून त्याचा संपूर्ण आढावा घेतला जात आहे. या सुविधेत आणखी सुधारणा घडवून आणण्यात येणार आहे. नवे तंत्रज्ञान, यंत्रणा जोडून सुविधा अद्ययावत् करण्यात येणार आहेत आणि त्रुटीही दूर करण्यात येणार आहेत. नवा अत्याधुनिक पालट घडवून आणण्यात येणार आहे. नावेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील भेटीत ‘अनमोल’च्या सुविधा, ‘डिजिटल टूल’, एकूण डाटा, एकूण झालेली नोंदणी, पुरवलेली सेवा यांची माहिती कर्मचार्‍यांकडून घेतल्याचे डॉ. अजय ट्राकरू यांनी सांगितले.