कराड, २१ एप्रिल (वार्ता.) – जगात निधर्मी असे काही नसून धर्म आणि अधर्म असे दोनच भाग अस्तित्वात आहेत. रामायण, महाभारत घराघरांत वाचले गेले पाहिजे. देशाला सश्रद्ध हिंदूंची आवश्यकता आहे, असे परखड मत प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ते ‘हिंदू एकता आंदोलना’च्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र’ या विषयांवर श्रीकृष्णमाई घाट येथे बोलत होते.
संपूर्ण जगाचे ‘इस्लामीकरण’ करणे हा इस्लाम धर्म आहे, तर ‘हे विश्वचि माझे घर’ ही मानवता दाखवणे, हे हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व असून सत्य आणि नीतिमत्ता आहे तेच ‘हिंदुत्व’ ! अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची शिकवण होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखान वधाच्या वेळी कृष्णनीती, तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडीचोळी देऊन सन्मानाने सुटका करते वेळी प्रभु श्रीरामांचा आदर्श समोर ठेवला.
अहिंसेनेच जर सर्व काही जिंकता आले असते, तर श्रीरामाने रावणाचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने पांडवांनी कौरवांचा वध केला नसता. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आपण आज हिंदू म्हणून जगू शकतो, अशा कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. गांधी वधानंतर नथुराम गोडसे यांना पकडायला बंदूकधारी लोक पाठवावे लागले. अहिंसेने सर्व काही जिंकता आले असते, तर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, हे नाटक केल्यामुळे माझ्यावर पेट्रोलबाँब फेकले गेले नसते. अहिंसा वगैरे काही नसून या जगात अस्तित्वासाठी हिंसाही करावीच लागते, हेच तत्त्वज्ञान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ग्रंथातून समस्त हिंदु समाजाला दिले असल्याचे प्रतिपादन श्री. शरद पोंक्षे यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या एका प्रतिनिधीचा श्री. शरद पोंक्षे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतिक उपाध्यक्ष श्री. विनायक पावसकर, संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत जिरंगे, भाजपचे संघटक श्री. मकरंद देशपांडे ,भाजपचे प्रदेश सचिव तथा हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी हिंदुत्व, गोरक्षण, दुर्ग संवर्धनासाठी नेहमीच कार्यरत रहाणारे अनुक्रमे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर आमले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. श्रीकांत एकांडे, गोरक्षा बचाव समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पावसकर, दुर्गरक्षक श्री. सत्येंद्र जाधव, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नर्मदा परिक्रमा करणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिल खुंटाळे यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत कार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.