आफ्रिकेत आढळणार्या ‘कॅथा इडूलिस काट’ या अमली पदार्थाच्या वनस्पतीपासून सिद्ध करण्यात आलेली दीड लाख रुपये मूल्याची पावडर पुणे येथील गुन्हे शाखेने पकडली आहे. गुन्हे शाखेने गेल्या ३ वर्षांत केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार अमली पदार्थांच्या सेवनाचा वाढता कल लगेच लक्षात येतो. पुण्याची ओळख ही ‘सांस्कृतिक राजधानी ते विद्येचे माहेरघर’ अशी सांगितली जाते; मात्र शाळेपासून महाविद्यालयापर्यंत अमली पदार्थांचे होणारे सेवन, तसेच गांजा, ड्रग्स यांपेक्षाही भयंकर अशा आफ्रिकेच्या अमली पदार्थाची पुण्यात सहज होणारी उपलब्धता हे गंभीर आहे. त्यासाठी अमली द्रव्यांच्या विक्रीवर आळा घालण्याची आवश्यकता आहे.
अमली पदार्थांमुळे संपूर्ण तरुण पिढी यांमध्ये वाहून जात आहे. तरुण पिढीला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अधू बनवणार्या अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात गुन्हे वाढतात. तरुण पिढी वाईट मार्गाला लागते. अमली पदार्थांच्या अवैध वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका होतो. अमली पदार्थ माफियांचे हे जाळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विणले गेलेले आहे. ज्या ठिकाणी या ड्रग्स माफियांचे जाळे आहे, त्या-त्या ठिकाणचे काही राजकीय नेते, पोलीसकर्मी यांचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याचे लक्षात येते; कारण या माफियांकडून त्यांना कोट्यवधी रुपयांचे हप्ते मिळत असतात. विविध अमली पदार्थांच्या सेवनानंतर गुन्हेगारी कृत्यांत भर पडण्यासह त्यातून अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. त्यामुळे तस्करांविरुद्ध प्रभावी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कोट्यवधी डॉलर्सचा चोरटा बाजार असलेला अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय संपूर्ण जगात एकप्रकारे समांतर अर्थव्यवस्थाच चालवतो, असे मानले जाते. ड्रग्जच्या तस्करीचा पैसा जगभरात आतंकवादासाठी वापरला जातो, हे वारंवार स्पष्ट होत आहे. याविषयी गुप्तचर यंत्रणांचेही दुमत नाही. तरीही सत्तेवर कुठलेही सरकार असले, तरी अन्वेषण यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा ड्रग्जचा प्रवास रोखण्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत, हे चिंताजनक आणि दुर्दैवी आहे.
त्यासाठी केंद्र सरकारने या कारवाईसाठी अन्वेषण यंत्रणांना मोकळीक द्यायला हवी. पोलिसांनीही या प्रकरणी कठोर भूमिका घेतल्यास अमली पदार्थांचा भस्मासुर आटोक्यात येऊ शकतो. यातूनच नशेच्या गर्तेत फेकली जाणारी तरुण पिढी वाचेल !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे