आज दैनंदिन जीवनातील आहार, पोशाख, केशभूषा, साहित्य, संगीत या सर्वांवरच पाश्चात्त्यांच्या विकृतीचा घट्ट पगडा आहे. त्यामुळे आपली ‘वृत्तीही’ तशीच झाली आहे. आपण कुठे जात आहोत ? हा प्रश्न पुष्कळ महत्त्वाचा आहे. यावर विचार करायलाही आपल्याला वेळ नाही किंवा आपण जे करतो ते योग्यच आहे, असा आपला गैरसमज झाला आहे. दुसर्याने सांगितलेले, अनुभवी लोकांचे अथवा थोरांचे मत का ऐकायचे ? किंवा धर्मशास्त्राप्रमाणे आपण का वागायचे ? असा दुराग्रह आपल्यात उत्पन्न झाला आहे. ही आजच्या मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीची देण आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
आजची युवा पिढी भरपूर पैसा आणि प्रगतीच्या नावाखाली ईर्षापूर्ण प्रतिस्पर्धेच्या मागे मृगजळासारखी धावते आहे. यात सुख, आनंद, शांती हे काहीही मिळत नसून फक्त मनस्ताप आहे. याचा परिणाम सर्वकाही असूनही निराशा आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत, तर आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत एका विशिष्ट चाकोरीबद्ध पद्धतीने जीवन जगण्याची सवय लागलेली आहे. हा पाश्चात्त्य विचारधारेचा चष्मा काढून महान हिंदु धर्माने जीवन जगण्याची कला शिकवली आहे, त्याकडे बघायला हवे.
मानव जन्माचे ध्येय निर्धारित आहे आणि ध्येय प्राप्तीचे साधनही साधूसंतांनी सांगितलेले आहे. आपले पूर्वज उच्चविद्या विभूषित होते; परंतु घराघरातून मिळणारे संस्कार, नीतीमत्तेचे धडे, इतिहासातून चेतवणारे राष्ट्रभक्तीचे स्फुलिंग, धर्मविषयक ग्रंथातून धर्माभिमान वाढवणारे ज्ञान इत्यादी मिळत असल्याने त्यांचे जीवन परिपूर्ण होते. आपणही आनंदी जीवनासाठी आपल्या पूर्वजांकडून शिकून पुढे पाऊल टाकायला हवे. आपण कोण आहोत ? आपली संस्कृती काय आहे ? आपले संस्कार काय आहेत ? हे समजून घ्यायला हवे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभ्यास करायला हवा. असे झाल्यास आपण स्वतःला नक्कीच पालटू शकतो. हे सामर्थ्य ईश्वराने आपल्याला आधीच दिले आहे. आपण हिंदु धर्मानुसार आचरण करून आपल्याकडे असणारा उपलब्ध वेळ आणि साधना यांचा योग्य वापर करून वरवरचे सुख नव्हे, तर व्यावहारिक अन् आध्यात्मिक अशा दोन्ही पथावर एकाच वेळी प्रगती करून परमोच्च आनंद प्राप्त करू शकतो.
– सौ. रमा देशमुख, नागपूर