इतरांचा विचार करणारे आणि अत्‍यंत प्रामाणिकपणे कर्तव्‍य करणारे अयोध्‍या (उत्तरप्रदेश) येथील सनातनचे १०७ वे समष्‍टी संत पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) !

२०.४.२०२३, म्‍हणजे चैत्र अमावास्‍या या दिवशी पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांची द्वितीय पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने…

२०.४.२०२३, म्‍हणजे चैत्र अमावास्‍या या दिवशी अयोध्‍या (उत्तरप्रदेश) येथील पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांची द्वितीय पुण्‍यतिथी आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची मुलगी सौ. क्षिप्रा जुवेकर (वर्ष २०२२ ची आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ३९ वर्षे) हिला त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद

पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

१. व्‍यवस्‍थितपणा

सौ. क्षिप्रा जुवेकर

१ अ. वडील पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांनी घर आणि अधिकोष यांविषयीची सर्व महत्त्वाची कागदपत्रे धारिकेत लावून कपाटात व्‍यवस्‍थित ठेवली असल्‍याने त्‍यांच्‍या निधनानंतर कागदपत्रांच्‍या दृष्‍टीने कुठलीही अडचण न येणे : ‘माझ्‍या वडिलांच्‍या (पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांच्‍या) निधनानंतर आम्‍हाला काही व्‍यावहारिक कामे पूर्ण करायची होती, उदा. घरावर नावे लावून घेणे आणि अधिकोषांची काही कामे करणे इत्‍यादी. या विषयीची कागदपत्रे पहाण्‍यासाठी आम्‍ही पू. बाबांचे (पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांचे) कपाट उघडले. तेव्‍हा सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्‍यांनी कपाटात व्‍यवस्‍थितपणे लावून ठेवली होती. वर्ष १९९९ मध्‍ये खरेदी केलेल्‍या घराचे लहान-सहान कागदही त्‍यांनी धारिकेत व्‍यवस्‍थित लावलेे होते. त्‍यामुळे कागदपत्रांच्‍या दृष्‍टीने आम्‍हाला कुठलीही अडचण आली नाही.

१ आ. वडील कर्करोगाने रुग्‍णाईत असतांनाही त्‍यांनी त्‍यांच्‍या वैद्यकीय उपचारांच्‍या संदर्भातील सर्व कागदपत्रे व्‍यवस्‍थित ठेवणे : पू. बाबांना रक्‍ताचा कर्करोग झाला होता. ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात राहून कर्करोगावरील उपचार घेत होते. तेव्‍हाही त्‍यांनी वैद्यकीय उपचारांच्‍या संदर्भातील प्रत्‍येक ‘प्रिस्‍क्रिप्‍शन’, पावती, देयके’, यांची धारिका बनवून अत्‍यंत सुंदर पद्धतीने ठेवली होती.

२. इतरांचा विचार करणे

२ अ. स्‍वतःच्‍या औषधे घेण्‍याच्‍या वेळा, औषधांचे प्रमाण इत्‍यादी सर्व गोष्‍टी नीट कागदावर लिहून ठेवल्‍यामुळे त्‍यांची सेवा करणार्‍या साधकांना अडचण न येणे : त्‍यांचा आजार वाढल्‍यामुळे त्‍यांच्‍या शारीरिक समस्‍या वाढू लागल्‍या. तेव्‍हा ‘त्‍यांची सेवा करणार्‍या साधकांना अडचण येऊ नये’, यासाठी त्‍यांनी एका कागदावर ‘कुठले औषध कुठल्‍या वारी, किती मात्रेत आणि केव्‍हा घ्‍यायचे आहे ?’, ही सर्व माहिती लिहून ठेवली होती.

३. वडिलांची विद्यार्थ्‍यांना शिकवण्‍याविषयी असलेली दायित्‍वाची भावना आणि कर्तव्‍य परायणता !

३ अ. वडिलांनी महाविद्यालयातील अत्‍यंत भ्रष्‍ट अशा वातावरणातही विद्यार्थ्‍यांना प्रामाणिकपणे शिकवणे, त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या मनातही त्‍यांच्‍याविषयी आदरभाव असणे : पू. बाबा ‘प्राध्‍यापक’ म्‍हणून नोकरी करत होते. तेव्‍हा तेथील शिक्षणव्‍यवस्‍थेची अवस्‍था अत्‍यंत दयनीय होती. तिथे ‘सर्वत्र अनुकृती (कॉपी) करून किंवा वशिला लावून पास होणे किंवा शिक्षकांशी गुंडगिरी करून गुण वाढवून घेऊन क्रमांक मिळवणे’, असे अनेक वाईट प्रकार चालत होते. महाविद्यालयात शिकवणारे प्राध्‍यापक बहुतेक वेळा केवळ नावापुरते महाविद्यालयात येत असत. वर्गात विशेष काही शिकवले जात नसे. अशा भ्रष्‍ट वातावरणातही पू. बाबा त्‍यांचे काम प्रामाणिकपणे करत असत. ते महाविद्यालयात शिकवायला जाण्‍यापूर्वी त्‍यांच्‍या विषयाच्‍या संदर्भातील अभ्‍यास करून टिपणेे (नोट्‍स) काढत आणि नंतरच वर्गात शिकवत असत. त्‍यामुळे केवळ पू. बाबांच्‍या वर्गातच शिकण्‍यासाठी ४० ते ५० विद्यार्थी असायचे. यावरून ‘आपण आपले कर्म प्रामाणिकपणे केले, तर समाजात परिवर्तन होते आणि त्‍यातून आपली साधनाही होते’, हे लक्षात येते.

३ आ. विद्या वाचस्‍पतीचा (पी.एच्.डी.चा) अभ्‍यास करणार्‍या कष्‍टाळू विद्यार्थ्‍यांना अभ्‍यास आणि संशोधन यांसाठी संपूर्णपणे साहाय्‍य करणे : पू. बाबा विद्या वाचस्‍पतीचा (‘पी.एच्.डी.’चा) अभ्‍यास करणार्‍या विद्यार्थ्‍यांना शिकवत होते. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्या वाचस्‍पतीसाठी अभ्‍यास करणारे अनेक विद्यार्थी दूरवरच्‍या गावातून येत असत. संशोधन कार्य समजून घेणे आणि ते लिहिणे इत्‍यादींसाठी अनेक घंटे लागत असल्‍यामुळे त्‍यांना २ – ३ दिवस आमच्‍या घरीच राहून अभ्‍यास करावा लागत असे. तेव्‍हा पू. बाबा त्‍यांची पुष्‍कळ काळजी घेत असत. ते विद्यार्थ्‍यांचे भोजन आणि निवास यांची उत्तम व्‍यवस्‍था करत असत. तेव्‍हा आम्‍ही एकत्र कुटुंबात रहात असल्‍यामुळे सुविधा अल्‍प होत्‍या; परंतु तरीही पू. बाबांमधील प्रीतीमुळे ते कष्‍टाळू विद्यार्थ्‍यांना संपूर्णपणे साहाय्‍य करत असत.

४. संपर्कातील सर्वांच्‍या मनात आदराचे स्‍थान मिळवणारे माझे वडील !

४ अ. विद्यार्थ्‍यांची वडिलांवर असलेली श्रद्धा ! : वर्ष २०२१ मध्‍ये पू. बाबांच्‍या देहत्‍यागानंतर आम्‍ही त्‍यांच्‍या महाविद्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेथील पू. बाबांचे विद्यार्थी असलेले आणि विद्या वाचस्‍पती झालेले एक प्राध्‍यापक आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘तुमच्‍या वडिलांनी मला पुष्‍कळ साहाय्‍य केलेे आहे. त्‍यांचे काम होण्‍यासाठी मला कोर्‍या कागदावर जरी स्‍वाक्षरी करावी लागली, तरी मी करीन ! इतकी माझी त्‍यांच्‍यावर श्रद्धा आहे.’’

४ आ. ‘पू. बाबा ज्‍या अधिकोशातून व्‍यवहार करायचे, त्‍या अधिकोशातील कर्मचार्‍यांनाही त्‍यांच्‍याप्रती अत्‍यंत आदरभाव आहे’, हेही आम्‍हाला अनुभवता आले.

५. आजही पू. बाबांनी वापरलेल्‍या वस्‍तूंमधून सुगंध येतो. त्‍यांनी लिहिलेल्‍या दैनंदिनीच्‍या वह्या (डायर्‍या) चैतन्‍यदायी वाटतात.

‘पू. बाबांच्‍या चरणी भावपूर्ण नमस्‍कार ! ‘त्‍यांचे गुण आमच्‍यामध्‍ये यावेत आणि आमचेही जीवन श्री गुरुचरणी समर्पित व्‍हावे’, अशी मी श्री गुरूंच्‍या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ३९ वर्षे), जळगाव (३.४.२०२२)

(क्रमशः)