भारतीय कुटुंबव्‍यवस्‍थेचे महत्त्व !

किशोरवयीन मुलांमध्‍ये वाढते विकार आणि अनारोग्‍य या पार्श्‍वभूमीवर कोलंबिया विद्यापिठात झालेल्‍या सर्वेक्षणाच्‍या निष्‍कर्षानुसार संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणार्‍या मुलांमध्‍ये नकारात्‍मक भाव, जंक फूड खाण्‍याच्‍या सवयी नसतात, ती आनंदी रहातात. अभ्‍यासातही त्‍यांची क्षमता इतर विद्यार्थ्‍यांच्‍या तुलनेत अधिक असल्‍याचे दिसून आले. या सर्वेक्षणातून भारतीय कुटुंबव्‍यवस्‍थेचे एकमेवाद्वितीयत्‍व पुनश्‍च सिद्ध झाले आहे.

‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्‍कृतीचे अनोखे वैशिष्‍ट्य आहे. भारतीय संस्‍कृतीतील एकही गोष्‍ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्‍यवस्‍था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत. संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन केल्‍याने परस्‍परांमध्‍ये चर्चा होऊन एकोपा वाढतो. एकमेकांविषयी प्रेम आणि आपुलकी वाढून परिणामी आरोग्‍य उत्तम रहाते. बुद्धी तल्लख रहाते आणि कार्यक्षमता वाढीस लागते. मानवी शरिराची संपूर्ण जडणघडण मन, बुद्धी आणि शरीर अशी एकत्र गुंफण असल्‍याने शारीरिक, मानसिक अन् कौटुंबिक स्‍वास्‍थ्‍य उत्तम रहाते.

भारतात समतोल आहार घेण्‍याची परंपरा पूर्वापार चालू आहे. भारतीय भोजनपद्धतीचा विचार केला असता षड्‌र्सान्‍ने पोटात जातील, अशाच पाककृती आहेत. नकारात्‍मक भाव असलेले चॉकलेट, पिझ्‍झा, बर्गर, मोमोज यांसारखे खाद्यपदार्थ भारतातील नाहीत. भारतीय चिकित्‍सापद्धत आयुर्वेदात आहार-विहारालाच महत्त्व दिले आहे. त्‍यावरच सर्व समाज अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आहार-विहार हे भारताचे बलस्‍थान आहे; परंतु भारतियांना सध्‍या विदेशींचे अंधानुकरण करण्‍याची सवय लागली आहे. या बलस्‍थानांवर आक्रमण करून कोणताही गाजावाजा न करता ही व्‍यवस्‍था उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याचे षड्‌यंत्र विदेशी आस्‍थापने आणि विशेषतः चायनीज अन् अमेरिकन आस्‍थापने करत आहेत.

मुळात ही सर्व आक्रमणे आणि प्रलोभने यांपासून पाल्‍यांचे रक्षण करणे, त्‍यांना दूर ठेवणे, हे दायित्‍व पालकांचे आहे. घरात मुलांनी आनंदात रहावे म्‍हणून पालकच मुलांंच्‍या आवडीचे पिझ्‍झा, बर्गर असे खाद्यपदार्थ आणून देतात. त्‍यांच्‍या आवडीचे नव्‍हे, तर त्‍यांच्‍या पोषणासाठी आवश्‍यक असे खाद्यपदार्थ उपलब्‍ध करून देणे, हे पालकांचे आद्यकर्तव्‍य आहे. केवळ तेव्‍हाच आरोग्‍यसंपन्‍न अशी पिढी निर्माण होऊ शकेल !

– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.