‘विश्‍वघातकी’ आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स !

‘तंत्रज्ञान आणि गुलामगिरी यांमधील एकमेव भेद हाच की, गुलामांना पूर्ण जाणीव असते की, ते स्‍वतंत्र नाहीत !’ मूळच्‍या लेबेनॉनचे प्रसिद्ध अमेरिकी गणितज्ञ नस्‍सीम निकोलस तलेब यांच्‍या या वक्‍तव्‍यात पुष्‍कळ काही दडलेले आहे. या दृष्‍टीकोनातून जर केवळ भारताचा विचार केला, तरी अन्‍य तंत्रज्ञानांचे आविष्‍कार बाजूला सारू; पण साधारण ६ वर्षांपूर्वी भारतात आलेले ‘फोर जी’ तंत्रज्ञान आणि त्‍याआधी आलेले ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ हे सामाजिक माध्‍यम यांनीच भारतियांची विचारसरणी, प्रत्‍येक क्षेत्रात कार्य करण्‍याची त्‍यांची पद्धत इतकेच काय, तर संपूर्ण जगरहाटी अक्षरश: ढवळून काढली. वर्ष २०१६ चा भारत आणि आजच्‍या भारतामध्‍ये आकाशपाताळाएवढा भेद आहे. तंत्रज्ञानाचे हेच फलित आहे. याचा थेट परिणाम भारतियांच्‍या शैक्षणिक, सामाजिक, कायदेशीर, नैतिक, धार्मिक, सांस्‍कृतिक अशा प्रत्‍येक स्‍तरावर झाला आहे. यामध्‍ये आपण ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’ म्‍हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा अजून नामोल्लेखही केलेला नाही !

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’चे तंत्रज्ञान हे साधारणपणे एका दशकाआधी रूढ होऊ लागले. ‘यू ट्यूब, फेसबुक, नेटफ्‍लिक्‍स यांसारख्‍या सामाजिक माध्‍यमांवर आपल्‍या आवडीनुसारच दिसणारे व्‍हिडिओ, विज्ञापने, गाणी (रिकमेंडेशन सिस्‍टम्‍स)’, ‘गूगल आणि तत्‍सम शोध संकेतस्‍थळे यांवरील अत्‍याधुनिक पद्धतींचा वापर करून एखादा विषय शोधणे’, ‘अलेक्‍सा’ अथवा ‘सिरी’ यांसारखे मानवी आवाज ओळखण्‍याचे तंत्रज्ञान’ हे समाजात रूढ झालेले काही आविष्‍कार होत. ‘विविध समस्‍यांचे स्‍वयंचलित पद्धतींनी केलेले निराकरण’ म्‍हणजेच ‘ऑटोमेटेड डिसिजन मेकिंग’ ही पद्धत व्‍यावसायिक क्षेत्रात रूढ झाली आहे. या सर्वांतच साधारण ६ मासांपूर्वी उदयास आलेले ‘चॅटजीपीटी’ आणि त्‍याच्‍याशी स्‍पर्धा करणारे गूगलचे ‘बार्ड’ हे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धीमत्तेतील आतापर्यंतचे सर्वांत मोठे शोध मानले जात आहेत.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’ तंत्रज्ञानात मानव घेत असलेली गरुडभरारी येणार्‍या काळाची भयावहता दाखवून देत आहे. गूगलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नुकतेच याविषयी महत्त्वपूर्ण कथन केले आहे. ते म्‍हणतात की, या तंत्रज्ञानाचे भविष्‍य डोळ्‍यांसमोर उभे राहून माझी झोप उडाली आहे. तंत्रज्ञानात गतीने होत असलेल्‍या प्रगतीचे नियमन करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे, अन्‍यथा तिचा अयोग्‍य वापर मानवास विनाशकारी ठरू शकतो, अशी काहीशी भीती पिचाई यांनी व्‍यक्‍त केली. येथेच नैतिकता आणि अध्‍यात्‍म यांचे महत्त्व लक्षात येते. ‘अध्‍यात्‍माविना केलेला विज्ञानाचा उदोउदो अन् त्‍यात साधलेली प्रगती जागतिक मानवसमुहाचा नाश करणार’, हेच पिचाई यांच्‍या वक्‍तव्‍यातून लक्षात घेतले पाहिजे. धर्माधारित समाजच वैज्ञानिक प्रगतीचे नियमन करू शकतो. यासाठीच तंत्रज्ञानासह मानवसमुहाला साधनारत करण्‍यास्‍तव जागतिक स्‍तरावर क्रांतीकारक प्रयत्न होणे अत्‍यावश्‍यक आहेत, अन्‍यथा मानवविश्‍व दिशाहीन होऊन स्‍वत:चा घात करणार, ही काळ्‍या दगडावरील पांढरी रेष आहे, हेच खरे !