साधकाने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला उपाय केल्यावर त्याला होणारा ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास नाहीसा होणे

‘स्लीप पॅरालिसिस्’ म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला जाग येत असतांना (अर्धवट जागृतावस्थेत असतांना) तिला हालचाल करता येत नाही किंवा बोलता येत नाही. याचा कालावधी काही सेकंद किंवा काही मिनिटे एवढाच असतो.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास होणे आणि त्रास होऊ लागल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करणे : ‘पूर्वी मला ३ – ४ मासांतून एकदा ‘स्लीप पॅरालिसस्’चा त्रास होत असे आणि त्यातून बाहेर पडल्यावर थकवा येत असे. अलीकडे १५ दिवसांत मला ५ – ६ वेळा ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास झाला. मला असा त्रास होऊ लागल्यावर मी प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करत असे. त्यानंतर २ – ३ मिनिटांनी माझा त्रास न्यून होत असे.

श्री. चेतन हरिहर

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे शेजारी एक काठी ठेवून झोपल्यावर सूक्ष्मातून दिसलेले दृश्य : ३०.१२.२०२२ या दिवशी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणार्‍या ‘स्लीप पॅरालिसिस्’च्या त्रासाविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला शेजारी एक काठी ठेवून झोपायला सांगितले. (काठी झोपणार्‍याच्या शय्येजवळ ठेवल्याने तिच्यातील तेजतत्त्वरूपी स्पंदनांच्या संपर्कामुळे त्याची उजवी नाडी कार्यरत रहाते. त्यामुळे त्याच्यातील क्षात्रतेज निजल्यावरही जागृत अवस्थेत रहाते आणि त्याचा स्थूलदेह सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आक्रमणांना प्रतिकार करण्यास सतर्क अन् संवेदनशील अवस्थेत रहातो. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शांत निद्रेसाठी काय करावे ?)) त्यानुसार मी त्या रात्री शेजारी काठी ठेवून झोपलो. मला ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास चालू झाल्यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘एका स्त्रीमध्ये देवी प्रगट झाली आणि ती देवी मला त्रास देणार्‍या वाईट शक्तींना हाकलून लावत आहे. त्या वाईट शक्ती भयभीत होऊन बाहेर पळत आहेत.’

३. त्यानंतर मला ३ – ४ मिनिटांनी जाग आली. तेव्हा मला नेहमीच्या तुलनेत ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास केवळ १० टक्के जाणवला. मला शरीर दुखण्याचा त्रास झाला नाही. मला उत्साह जाणवत होता. त्यानंतर मला ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास झाला नाही.

मला होणारा ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास केवळ गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु गाडगीळकाका यांचा संकल्प यांमुळे नाहीसा झाला. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ ॐ

– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२.१.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक