देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सनातनच्या ११८ व्या समष्टी संत पू. रत्नमाला दळवी यांचा आज चैत्र कृष्ण त्रयोदशी (१८ एप्रिल २०२३) या दिवशी ४६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. रत्नाताई एकदा मिरज आश्रमात सेवेसाठी गेल्या असतांना साधिकेला त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू. रत्नमाला दळवी यांना ४६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प्रेमभाव
पू. रत्नमालाताई प्रतिवर्षी काही दिवस मिरज आश्रमात सेवेसाठी येतात. तेव्हा त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात आणि सर्वांमध्ये सहजतेने मिसळतात. त्या प्रेमळ स्वभावाच्या आहेत.
२. तत्त्वनिष्ठता
त्या साधकांच्या चुका तत्त्वनिष्ठतेने सांगतात आणि साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण करतात. त्या साधकांना भावनेच्या स्तरावर कधीच हाताळत नाहीत.
३. गुरुकार्याची तळमळ
अ. कंबर आणि हात दुखण्याचा तीव्र त्रास असूनही पू. ताई अखंड सेवारत असतात. ‘त्यांच्या शारीरिक अडचणींमुळे सेवा थांबली’, असे त्यांच्याकडून कधीच होत नाही.
आ. त्या सतत अडचणींवर उपाययोजना काढतात आणि सेवा पूर्ण करतात. साधक अल्प असूनही त्या संघभावाने सेवा पूर्ण करतात. त्या सर्व सेवा वेळेत आणि परिपूर्ण करतात.
इ. मी त्यांना कधीही अडचणी विचारायला दूरध्वनी केला, तर त्या प्रेमाने आणि शांतपणे त्याविषयी सांगतात.
ई. आमच्याकडून सेवेतील नोंदी चुकल्या असतील किंवा राहिल्या असतील, तर पू. ताईंच्या ते लगेच लक्षात येते आणि त्या त्याविषयी आम्हाला कळवतात. यातून त्यांची सेवेशी एकरूपता लक्षात येते.
४. सहसाधकांना सेवेचे नियोजन करण्यास शिकवणे
पू. ताईंनी आम्हाला ‘सेवेचे नियोजन कसे करावे ? नोंदी कशा कराव्यात ?’ हे सोप्या पद्धतीने आणि सहजतेने शिकवले. त्यामुळे सेवेत सुसूत्रता येऊ लागली. दिवसभरात सेवा करतांना माझ्या मनात येणारे सर्व विचार न्यून झाले. त्यामुळे मला सेवेतून आनंद मिळू लागला.
५. अनुभूती
५ अ. पू. रत्नमालाताई यांचे शिबिरात मार्गदर्शन चालू असतांना वातावरणात भावाची स्पंदने पसरणे आणि त्यांच्या भोवती पांढरी प्रभावळ दिसणे : वर्ष २०२२ मध्ये झालेल्या साधनावृद्धी शिबिरात पू. रत्नमालाताई मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी वातावरणात भावाची स्पंदने पसरून सभागृहातील वातावरण पालटले आणि शिबिरार्थींचा उत्साह वाढला. त्या वेळी मला पू. ताईंच्या भोवती पांढरी प्रभावळ दिसली.
‘परात्पर गुरु डॉक्टर, आम्हाला पू. रत्नमालाताईंचा सहवास मिळतो. त्यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. आम्हाला त्यांचा साधनेसाठी लाभ होऊ दे, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज, जिल्हा सांगली. (२१.११.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |