उत्तरप्रदेशमध्ये १-२ नव्हे, तर तब्बल १०० गुन्हे नोंद असलेला कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना तिघा तरुणांनी सर्वांसमक्ष गोळ्या झाडून ठार मारले. ही घटना कशी घडली ? आरोपींनी कुणाच्या सांगण्यावरून ही हत्या केली ? आदी सर्व तपशील यथावकाश समोर येईलच. ही हत्या झाली खरी; परंतु या हत्येचे उत्तरप्रदेशमधील आणि एकूणच देशातील नागरिकांना वाईट वाटल्याचे चित्र दिसले नाही. सामाजिक माध्यमांवर तर ‘नियतीचा न्याय’ अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. एकूण समाजमन असे असतांना स्वतःला पुरोगामी म्हणवणार्यांनी टुणकन डबक्याबाहेर उडी मारून ओरडणे चालू केले आहे. वास्तविक कुणीही, कुणाचीही आणि कुठल्याही कारणासाठी हत्या करणे चुकीचे आहे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी आपल्याकडे कायदे, न्यायपालिका अशा सक्षम यंत्रणा आहेत. तथापि जेव्हा निषेध एकतर्फी व्यक्त केले जातात, तेव्हा खर्या अर्थाने वादाला तोंड फुटते. असे वाद निर्माण करायचे ‘कंत्राट’ नेहमी समाजघातकी पुरो(अधो)गाम्यांकडे असते.
आताही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘कुणीही कारागृहात गेले, तर तुम्ही (उत्तरप्रदेश सरकार) त्यांची हत्या करणार का ? पोलिसांनी आरोपींना संरक्षण पुरवणे आवश्यक होते. गुन्हेगारांना मारणे, हा समस्येवरील उपाय नाही. अशा प्रकारे मारणे चुकीचे आहे’, असे विधान केले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘गुंड हा गुंड असतो. त्याच्याविषयी सहानुभूती बाळगण्याची आवश्यकता नाही. तथापि पोलीस संरक्षणात हत्या झाली, तर प्रश्न विचारणे आवश्यक आहे’, असे विधान केले. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनीही या घटनेमागे षड्यंत्र असल्याची शक्यता वर्तवत चौकशीची मागणी केली. एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही ‘या घटनेचा निषेध करायला शब्द नाहीत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘दोघांना कशा प्रकारे मारून टाकले ? भाजपच्या राज्यात हे काय चालले आहे ?’, अशी भावना व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वाड्रा, काँग्रेसेचे माजी नेते अधिवक्ता कपिल सिब्बल आदींनीही साधारण अशाच प्रकारच्या भावना मांडल्या. या सर्वांचे शब्द वेगळे असले, तरी सूर समान होता. येथे प्रश्न असा उपस्थित होतो की, या सर्व नेत्यांच्या अशा भावना उमेश पाल यांच्या हत्येच्या वेळी कुठे गेल्या होत्या ? उमेश पाल यांची हत्या याच अतिक अहमदने स्वत:च्या परिवाराकरवी नुकतीच घडवून आणली होती. मग त्या वेळी वरील नेत्यांनी अतिक अहमदचा साधा निषेध तरी केला का ? तेव्हा त्यांना उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था आठवली नाही का ? अतिक अहमदने वर्ष २००५ मध्ये बहुजन समाजवादी पक्षाचे तत्कालीन आमदार राजू पाल यांची अगदी अशाच प्रकारे हत्या केली होती. जशी हत्या अतिकच्या मारेकर्यांनी अतिकची केली, त्याचप्रमाणे अनेक पिस्तूलधारकांनी राजू पाल यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या वेळी राजू पाल यांच्या समर्थकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती केले. तेव्हा अतिकने त्याच्या गुंडांना रुग्णालयात पाठवून राजू पाल यांच्या मृतदेहावरही गोळ्या झाडायला लावल्या होत्या ! क्रूरपणाचे हे सर्वाेच्च टोक आहे. हे पहाता ‘आपण अप्रत्यक्षपणे; पण कुणाचे समर्थन करत आहोत ?’, याचे भान तरी वरील नेत्यांना आहे का ? असा प्रश्न पडतो. अतिक अहमदचा निषेध करणे तर दूरचेच; पण समाजवादी पक्षाने त्याला ४ वेळा आमदार आणि एकदा खासदार केले ! लोकशाहीची ही क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. एकूणच सध्या वेगवेगळ्या नेत्यांना अतिकच्या प्रेमाचा आलेला उमाळा अती आहे आणि त्यांच्यातील एकतर्फी वृत्ती दर्शवणारा आहे, हे एव्हाना जनतेसमोर आले असून जनता जनार्दनच मतपेटीद्वारे अशांचा योग्य तो न्यायनिवाडा करील, यात शंका नाही !
गुंडांची अप्रत्यक्षपणे पाठराखण करणाऱ्यांचा योग्य तो न्यायनिवाडा जनता-जनार्दनच करील ! |