शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचे निमित्त साधून सुधीर मुनगंटीवार यांची ब्रिटीश उपउच्चायुक्त अॅलन गॅम्मेल यांच्याशी विस्तृत चर्चा !
मुंबई – ब्रिटन येथे असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘जगदंबा तलवार’ आणि ‘वाघनखे’ भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटीश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी त्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ब्रिटीश सरकारच्या वतीने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त ‘जगदंबा तलवार’ आणि ‘वाघनखे’ महाराष्ट्र शासनाला सुपूर्द करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (ब्रिटिशांनी लुटून नेलेल्या या दोन्ही गोष्टींना ७५ वर्षांनंतर भारतात आणावे लागत असेल, हे तर केवळ मतांसाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा उदोउदो करणार्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! – संपादक)
या चर्चेच्या वेळी ब्रिटीश उच्चायुक्तालयातील राजकीय विभागविषयक उपप्रमुख श्रीमती इमोजेन स्टोन याही उपस्थित होत्या. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्यशासन राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
We thank Hon'ble Shri @alangemmell and Smt. Imogen Stone for their cooperation in this sensitive matter and for understanding our sentiments. pic.twitter.com/qIDmlMWmO6
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) April 15, 2023
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा तलवार’ आणि ‘वाघनखे’ भारतात आणण्याच्या दृष्टीने मे मासाच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात इंग्लंडमध्ये संबंधित अधिकार्यांसमवेत सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे. या प्रस्तावित बैठकीत दोन्ही गोष्टी आणण्यासंदर्भात तपशीलवार प्रक्रिया ठरवण्यात येईल.
या बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांसह ब्रिटीश उपउच्चायुक्त अॅलन गॅम्मेल, महाराष्ट्र चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, राज्य पुरातत्व संचालक तेजस गर्गे, चेतन भेंडे आणि मंत्री कार्यालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
इंग्लंड-महाराष्ट्र यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण होणार !
ब्रिटन आणि भारत यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण वाढण्यासाठी चर्चा झाली. यानुसार महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटनमध्ये सादरीकरण करतील, तसेच ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येऊन त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. महाराष्ट्राचे २५ विद्यार्थी अभ्यासासाठी ब्रिटनमध्ये आणि ब्रिटनचे २५ विद्यार्थी महाराष्ट्रात येतील. या सांस्कृतिक आदानप्रदानाच्या संदर्भात महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश सरकार यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल.