आतंकवादाचा त्याच पद्धतीने अंत !

डावीकडून अशरफ अहमद आणि अतिक अहमद

उत्तरप्रदेश येथील कुख्यात महागुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराज येथे १५ एप्रिलला रात्री काही मारेकर्‍यांनी हत्या केली. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ यांना पोलिसांच्या संरक्षणात वैद्यकीय चाचणीसाठी नेले जात असतांना, त्यांची हत्या झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उपस्थित पोलीस, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनाही काही क्षण ‘नेमके काय होत आहे ?’, ते लक्षात आले नाही. मुख्य म्हणजे मारेकर्‍यांनी अतिक आणि त्याचा भाऊ यांना ठार केल्यानंतर त्वरित पोलिसांकडे आत्मसमर्पण केले; कारण त्यांना बहुदा योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात पोलिसांकडून ठार होण्याची भीती वाटत असेल ! या घटनेने केवळ उत्तरप्रदेशच नाही, तर देशातच खळबळ उडाली आहे.

उत्तरप्रदेश येथील ‘माफियाराज’ची चर्चा बरीच होत असते. विशेषत: योगी आदित्यनाथ सत्तेत येण्यापूर्वी तेथे गुंडच काही ठिकाणांचे मतदानाचे परिणाम ठरवत आणि तेही कारागृहातून ! कारागृहातून गुंड निवडणुका लढवत आणि विशेष म्हणजे जिंकूनही येत. असे केवळ भारतातच घडू शकते. प्रयागराज हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र ! त्याला योगी आदित्यनाथ यांच्या सत्ताकाळापूर्वी ‘अलाहाबाद’ म्हटले जायचे. योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद नाव पाटलून पुन्हा मूळ नाव ‘प्रयागराज’ केले. उत्तरप्रदेशातील हेच ते ठिकाण आहे, जेथे ४४ वर्षांपूर्वी अतिक अहमद या माफियाचा उदय झाला होता. अतिक अहमदवर आतापर्यंत ४० हून अधिक हत्यांचे गुन्हे नोंद आहेत, त्याशिवाय अपहरण, खंडणी वसुली, भूमी बळकावण्याचे अनेक गुन्हे नोंद आहेत. ४ दशके एखादा गुंड राज्यात दहशत माजवतो, हेच मुळी लज्जास्पद आहे. त्यातही हा गुंड उत्तरप्रदेशात एकदा नव्हे, तर ४ वेळा आमदार बनतो, १ वेळा खासदार म्हणून उत्तरप्रदेशातून निवडून येतो, हे सर्व कोड्यात टाकणारे आहे. वर्ष २०१२ मध्ये १० न्यायाधिशांनी अतिकच्या भीतीमुळे त्याच्या सुनावणीपासून लांब रहाणेच पसंत केले होते. अगदी फेब्रुवारी २०२३ मध्ये बसपचे आमदार राजू पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी मुख्य साक्षीदार असलेले उमेश पाल यांची हत्या करण्यात आली. तोपर्यंत उत्तरप्रदेशात अतिक याची दहशत कायमच होती. त्याने १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक संपत्ती स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावे जमवली होती. एकेकाळी १५० गुंडांची टोळी बाळगणार्‍या अतिक अहमद याचा त्याच पद्धतीने आणि त्याच्याच भूमीवर अंत झाला, हे लक्षात घेण्याचे सूत्र आहे. हा कर्मफलन्याय आहे. पूर्ण कुटुंब गुन्हे विश्वाशी संबंधित असणार्‍या एका गुंडाची दहशत आता संपुष्टात आली आहे. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी कारागृहात असलेल्या अतिक अहमदची अनेक घरे, बंगले, दुकाने यांवर बुलडोझर चालवण्यास प्रारंभ करून त्याची दहशत संपवण्यास प्रारंभ केला आहे.

समाजवादी पक्षावर बंदी हवी !

योगींनी अतिक याचे वर्णन ‘समाजवादी पक्षाने पोसलेला माफिया’, असेच केले आहे. तसेच ‘या माफियाला मातीत मिळवू’, अशीही चेतावणी तेथील विधीमंडळाच्या सभागृहात दिली होती. यातून उत्तरप्रदेशमध्ये गुंडाराज उदयास येण्यास आणि चालू रहाण्यास समाजवादी पक्षच कारणीभूत आहे, हे लक्षात येते. त्याच्या मुलाला पोलिसांनी चकमकीत ठार केल्यावरही अतिक याने ‘कारागृहाबाहेर आल्यावर पोलिसांना बघून घेईन’, अशी धमकी दिली होती. एवढी वर्षे कारागृहात राहूनही एका गुंडाचा उद्दामपणा अल्प होत नाही, यावरून ‘तो कारागृहात शिक्षा नव्हे, तर पाहुणचार भोगतो कि काय ?’, अशी शंका येते. अतिक याचे गुंडाराज एवढे वाढू देण्यासाठी समाजवादी पक्षालाही उत्तरदायी ठरवून पक्षाच्या पदाधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी. समाजवादी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी महिला-मुली यांच्यावर बलात्कार केल्यावर मुलायमसिंह यादव यांनीच ‘मुलांकडून काही चुका होतातच’, असे विधान करत त्यांचे समर्थन केले होते. ‘ज्या पक्षाकडूनच गुन्हेगारीला समर्थन दिले जाते, गुंडांना निवडणुकीत तिकीट दिले जाते, तो पक्ष म्हणून कार्यरत कसा राहू शकतो ?’, ‘त्या पक्षावर बंदी का घालू नये ?’, असे सर्वसामान्यांना वाटल्यास त्यात नवल ते काय ? अतिकचे पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय.शीही संबंध होते आणि ड्रोनद्वारे त्याला शस्त्रांचा पुरवठा केला जायचा, याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

हिंदु-मुसलमान रंग का ?

अतिक याच्या मुलाला पोलिसांनी चकमकीत ठार मारल्यावर समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्. या मुसलमानधार्जिण्या पक्षांकडून घटनेला हिंदु-मुसलमान रंग देण्याचा प्रयत्न केला आणि मूळ विषयावरून समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न केला. आताही अतिक याला ठार मारणारे गुंड हिंदु आहेत आणि तो मुसलमान आहे. त्यामुळे पुन्हा तोच सूर एम्.आय.एम्.ने आळवला आहे. वास्तविक उत्तरप्रदेशातील गुंडाराज संपवण्यासाठी तेथील गुंडांसह पोलिसांच्या ज्या चकमकी झाल्या आहेत, त्यांमध्ये केवळ ३७ टक्के गुंड मुसलमान आहेत, तर उर्वरित गुंड हिंदु आहेत. कुख्यात गुंड विकास दुबे हा पोलीस चकमकीत मारला गेला, तेव्हा कुणी ‘हिंदु गुंड मारला गेला’, असे मत व्यक्त केले नाही. तेव्हा गुंड मारला गेल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता पुन्हा धर्माचे सूत्र का उपस्थित केले जात आहे ? येथेही मुसलमानांच्या लांगूलचालनाचा विषय आहे. एम्.आय.एम्. आणि समाजवादी यांच्यात ‘मुसलमानांचे आम्हीच पाठीराखे’, हे दाखवण्याची चढाओढ लागली असल्यामुळे ते योगी यांच्याकडून गुंडांवर केलेल्या कारवाईला विरोध करत आहेत. असे असले, तरी उत्तरप्रदेशातील बहुसंख्य जनतेचा योगी सरकारला गुंडांविरुद्ध करत असलेल्या कारवाईच्या संदर्भात पाठिंबा आहे आणि ते समाधानी आहेत. योगी यांनी उर्वरित गुंडांचा बीमोड करून राज्यात भयमुक्त वातावरण निर्माण करावे, ही अपेक्षा !

देशातील गुंडाराज संपवण्यासाठी इच्छाशक्ती असलेले योगी आदित्यनाथ यांच्यासारखे शासनकर्ते आवश्यक !