पुणे येथील शास्त्रीय गायक आणि गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर यांनी ‘संगीताच्या माध्यमातून साधना’, या विषयावर केलेले अनमोल मार्गदर्शन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी २०.९.२०१९ या दिवशी पुणे येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी पं. डॉ. कशाळकर यांनी ‘संगीताच्या माध्यमातून साधना’, या विषयावर केलेले अनमोल मार्गदर्शन पुढे दिले आहे.

पं. डॉ. विकास कशाळकर

१. पं. डाॅ. विकास कशाळकर यांनी संगीत-उपासनेविषयी केलेले विवेचन !

१ अ. पृथ्वी सूर्यापासून विलग होत असतांना उत्पन्न झालेला आकार आणि नाद ‘ॐ’कार असणे अन् प्रत्येक प्राणीमात्राच्या कुंडलिनीच्या ठिकाणी ‘ॐ’कार स्थित असणे : जेव्हा सूर्यापासून पृथ्वी वेगळी झाली, तेव्हा ती वायूरूपात होती. त्या वेळी वायूरूपात जो आकार होता, तो ‘ॐ’ होता. पृथ्वी विलग होतांना नाद उत्पन्न झाला. तो ‘ॐ’काराचा नाद होता आणि तो ‘ॐ’कार मनुष्य प्राण्यांच्या कुंडलिनीच्या ठिकाणी आला. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ‘ॐ’कार स्थित असतो. त्याचे कारण म्हणजे जे ब्रह्मांडात आहे, ते पिंडात आहे. संगीत-उपासना म्हणजे आपल्या पिंडात असलेल्या ‘ॐ’काराचीच उपासना होय आणि ‘ती बाहेर काढणे’, यालाच ‘संगीत’ म्हणतात. वायुपुराण आणि विष्णुपुराण या ग्रंथांमध्ये संगीताबद्दल पुष्कळ माहिती दिली आहे.

१ आ. साधना आणि आत्मिक विकास हे पूर्वापार संगीताचे प्रयोजन असणे : पूर्वापार संगीताचे प्रयोजन साधना आणि आत्मिक विकास हे मानले आहे. ‘नादोपासनया देवा ब्रह्मविष्णुमहेश्वराः।’, म्हणजे ‘नादाची उपासना ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची पूजाच आहे; कारण नाद हा त्यांच्याहून भिन्न नाही.’ सध्या आपण संगीत मनोरंजनासाठी वापरतो. पूर्वीच्या काळी लोक देवाची उपासना करण्यासाठी ते वापरत असत.

१ इ. भारतीय संगीतात आवर्तन पद्धत असून ती वेदकालीन आणि सात्त्विक असणे : पाश्चात्त्य देशात तालाची आवर्तनात्मक पद्धत नाही. ती ‘लिनीअर’, म्हणजे रेषात्मक आहे. (ती चालू झाल्यावर चालूच रहाते. ती वर्तुळाकार नसल्याने पुन्हा पहिल्या भागाकडे परत येत नाही, म्हणजे ती ‘लिनीयर’ आहे.) भारतीय पद्धतीत ताल पद्धत ही ‘सम’ (टीप १), ‘काल’ (टीप २) दर्शवणारी आहे. मंत्र अथवा श्लोक म्हटल्यावर समेवर येतो, म्हणजे त्याला ‘एक आवर्तन (टीप ३) पूर्ण होणे’, असे म्हणतात. ही संकल्पना संगीतात आवर्तन स्वरूपात आली. ही संकल्पना वेदकाळापासून आली आहे आणि ती सात्त्विक आहे.

टीप १ – सम : तालातील प्रमुख मात्रेस ‘सम’, असे म्हणतात. प्रत्येक तालात समेची मात्रा ही नेहमी पहिली असते.

टीप २ – काल : तालातील दुसर्‍या प्रमुख मात्रेस ‘काल’, असे म्हणतात. कालाची मात्रा ही तालाच्या दुसर्‍या अर्ध्या भागाची आरंभीची मात्रा असते.

टीप ३ – आवर्तन : तालाच्या पहिल्या मात्रेपासून क्रमशः पुन्हा पहिल्या मात्रेवर येण्याच्या क्रियेस ‘आवर्तन’, असे म्हणतात.

१ ई. गायनाच्या नादाने कलाकारात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि ही ऊर्जा कलाकाराला टवटवीत ठेवत असणे : ‘नादयोग’ हा पूर्वीच्या ग्रंथांत फार पूर्वीपासून आहे. जुन्या नादोपचारात सांगितले आहे, ‘मनुष्याच्या हृदयाच्या ठिकाणी अनाहतचक्र असते.’ बाहेरच्या नादाशी अनाहतचक्रात असलेला ध्वनी जोडला, तर तुमचे जीवन योग्य पद्धतीने चालते. तुम्हाला बाकीच्या उपचारांची आवश्यकता भासत नाही. त्याविषयी एक श्लोक आहे,

नकारं प्राणनामानं दकारमनलं विदुः ।
जातः प्राणाग्निसंयोगात्तेन नादोऽभिधीयते ।।

– संगीतरत्नाकर, अध्याय १, प्रकरण ३, श्लोक ६

अर्थ : (‘नाद’ या शब्दातील) ‘न’कार हा प्राणवाचक, तर ‘द’कार हा अग्निवाचक आहे. प्राण आणि अग्नि यांच्या संयोगाने जो उत्पन्न होतो, त्याला ‘नाद’, असे म्हणतात.

जेव्हा प्राणशक्ती ऊर्जेशी संयोग पावते, तेव्हा नादाची निर्मिती होते; म्हणजे तुम्ही गातांना शरिरात ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा तुम्हाला टवटवीत ठेवते.

२. पं. डॉ. विकास कशाळकर यांनी संगीतातून योग साध्य होण्याविषयी केलेले मार्गदर्शन !

२ अ. संगीतातून मनाची एकाग्रता सहज साध्य होणे आणि तोच योग असणे : योगाचे स्थान म्हणजे ‘चित्तवृत्तिनिरोधः’ होय. चित्तवृत्ती भरकटू द्यायची नसेल, तर तुमचे चित्त विशिष्ट ठिकाणी केंद्रित व्हावे लागते. ते केंद्रित करण्याचे काम संगीतामुळे होते. आजपर्यंत अनेक संतांनीही संगीताच्या माध्यमातून तत्त्वज्ञान सांगितले; कारण संगीतामुळे लक्ष केंद्रित करणे सोपे होते. माणूस संगीतात अनेक घंटे रमून जाऊन इतर बाह्य गोष्टींपासून दूर होतो. ही शक्ती संगीतामध्ये आहे आणि तोच ‘योग’ आहे. ‘योग’ म्हणजे मनाच्या एकाग्रतेने परमेश्वराला जुळवून घेणे. ते संगीतामुळे साध्य होते.

२ आ. संगीताची साधना करतांना व्यक्ती प्रथम त्यात रममाण होऊन नंतर आपोआप बाह्य जगतातून दूर होणे आणि नंतर तिने योगिक अवस्था प्राप्त करणे : संगीताची साधना करतांना व्यक्ती एकदम योगिक अवस्थेला जात नाही. प्रथम ती त्या गाण्यात रममाण होते आणि मग ती बाह्य जगतातून आपोआप अलिप्त होते. काही योगी केवळ बसलेले असले, तरी त्यांच्या आत संगीत चालू असते. आमचे गुरुजी (पं. गजाननबुवा जोशी) तसेच होते. कुणी नातेवाईक आले, तरी गुरुजी त्यांना ‘बसा’ म्हणायचे आणि त्यांचे गाणे चालू असायचे. नातेवाईक ‘जातो’, असे म्हटल्यावर गुरुजी ‘बरं’ म्हणायचे; म्हणजे ‘कुणी भेटायला आला’, याचे त्यांना काही नसायचे. ते मायेपासून दूर गेले होते. शेवटी ही योगिक अवस्थाच आहे.

२ इ. माणसाचे अंतिम ध्येय ‘सत्-चित्-आनंदावस्था प्राप्त करणे’, हे असून संगीतामुळे ते साध्य होऊ शकणे : आपल्याला जो आनंद मिळतो, त्याची एक अंतिम अवस्था असते. तिलाच ‘सत्-चित्-आनंदावस्था’, असे म्हणतात आणि तुम्ही संगीतातून या अवस्थेला पोचू शकता. माणसाचे पृथ्वीवर येण्याचे प्रयोजन म्हणजे जीवनात शाश्वत आनंद मिळवणे. ते संगीतातून साध्य होते. ही अवस्था संगीतातील सूर, ताल आणि लय यांमुळे येते; परंतु ती अवस्था यायला वेळ लागतो. ते सोपे नाही.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.४.२०२३)

पं. डॉ. विकास कशाळकर यांचा परिचय 

पं. डॉ. विकास कशाळकर हे पुणे येथे वास्तव्यास असून ते शास्त्रीय गायक आणि गायनगुरु आहेत. त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील (कै.) अधिवक्ता नागेश कशाळकर यांच्याकडून घेतले. त्यानंतरचे पुढील शिक्षण त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडे गुरु-शिष्य परंपरेतून घेतले. पं. कशाळकर यांचे गायनाचे कार्यक्रम देश-विदेशात होत असतात. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते अनेक विद्यापिठांत संगीताविषयीचे सल्लागार आणि गुरु म्हणून कार्यरत आहेत.