सद्गुरु पिंगळेकाका यांच्या चरणी साष्टांग नमस्कार !
मला काही कारणास्तव घरी जावे लागले. त्या वेळी घरात प्रतिकूल परिस्थिती होती. त्यातून बाहेर कसे यायचे ?, हे मला समजत नव्हते. त्या वेळी आम्हा सर्व कुटुंबियांना गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि आपली कृपा अनुभवता आली. त्यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
१. आईला साधनेचे महत्त्व सांगितल्यावर तिच्यात पालट होऊन तिने नामजप करण्यास आरंभ करणे
या प्रसंगात माझ्या आईला पुष्कळ ताण आला होता. तेव्हा मी तिला प्रभु श्रीरामाच्या जीवनातील प्रसंग सांगून म्हटले, साधना केल्यास तू या प्रसंगातून बाहेर येऊ शकते. त्यानंतर मी आईला स्वयंसूचना बनवून दिल्या आणि तिला स्वयंसूचना सत्रे करायला सांगितली. आता पूर्वीच्या तुलनेत तिच्यात पुष्कळ पालट झाला आहे. ती जपमाळ घेऊन श्रीरामाचा नामजप करते.
२. मोठ्या बहिणीत झालेला पालट
२ अ. बहिणीला साधनेचे महत्त्व लक्षात येणे : मी आईला साधनेविषयी सांगत असतांना माझ्या मोठ्या बहिणीनेही ते सर्व ऐकले. ती मला म्हणाली, आतापर्यंत तू जे साधनेविषयी सांगायची, ते सर्व मला अनावश्यक वाटायचे. आज तू जे सांगत आहेस, ते मला समजत आहे आणि खरे वाटत आहे.
२ आ. बहीण प्रथमच मनमोकळपणे बोलणे आणि तिने श्रीकृष्णाचा नामजप अन् स्वयंसूचना सत्रे करण्यास होकार दर्शवणे : एकदा रात्री ३ वाजेपर्यंत माझी मोठी बहीण मला साधनेविषयी विचारत होती. आजपर्यंत ती कधीही माझ्याशी मनमोकळेपणे बोलली नव्हती. तिने तिच्या मनातील सर्व विचार मला सांगितले आणि कोणता नामजप करू ?, असेही मला विचारले. मी तिला ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा नामजप करायला आणि स्वयंसूचना सत्रे करायला सांगितल्यावर तिने होकार दिला. ती मला म्हणाली, माझ्या मनातील सर्व विचार दूर करून मला भगवंताच्या अनुसंधानात रहायचे आहे.
३. लहान भाऊ मला म्हणाला, सर्वांवर हिंदु धर्माचे संस्कार होणे किती आवश्यक आहे !, हे यातून लक्षात आले.
४. माझ्या आईने सर्वांना सांगितले, सर्वांनी भगवंताचे नाम घ्या. तेच आवश्यक आहे. आता आई, लहान भाऊ आणि मोठी बहीण यांनी नामजप करायला आरंभ केला आहे.
५. कठीण प्रसंगात समाजातील व्यक्तींना साधकांचा आधार वाटत असल्याचे या प्रसंगातून शिकायला मिळणे
सद्गुरु काका, आजपर्यंत माझे साधनेचे प्रयत्न होत नव्हते. आपल्या कृपेने आता माझे थोडे प्रयत्न होत आहेत. असे असूनही प्रत्येक कठीण प्रसंगात समाजातील व्यक्तींना गुरुदेवांच्या साधकांचा कसा आधार वाटतो !, हे मला शिकायला मिळाले.
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (२२.१.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |