सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली अष्टांग साधना, तिचा क्रम आणि पंचमहाभूते यांचा संबंध

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली नाविन्यपूर्ण अशी अष्टांग साधना !

सनातनचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी व्यष्टी साधनेसाठी (स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी) नाविन्यपूर्ण अशी अष्टांग साधना सनातनच्या साधकांना, तसेच साधनेविषयीच्या ग्रंथांच्या माध्यमातून समाजालाही सांगितली. याप्रमाणे साधना केली, तर आध्यात्मिक उन्नती होतेच. साधकांनी याप्रमाणे साधना केल्यामुळे गेल्या २० – २५ वर्षांत सनातनचे १२३ जण संतपदाला पोचले आणि १ सहस्र ८७ साधकांनी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून तेही संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. (२५ मार्च २०२३ पर्यंतची आकडेवारी)

२. अष्टांग साधनेचा क्रम वैशिष्ट्यपूर्ण असणे

या अष्टांग साधनेमध्ये स्वभावदोष-निर्मूलन (आणि गुणसंवर्धन), अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृती, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती हे ८ टप्पे आहेत; म्हणून तिला अष्टांग साधना म्हणतात. हे टप्पे म्हणजे साधनेमध्ये प्रथम कशाला प्राधान्य द्यायचे आणि एकेक टप्पा गाठत साधनेत पुढे कसे जायचे ?, या क्रमाने आहेत. हा जो साधनेचा क्रम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितला आहे, तो वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो पृथ्वी, आप, तेज, वायु अन् आकाश या पंचमहाभूतांशी संबंधित आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

३. देहातील पंचतत्त्वांपैकी एकेक तत्त्व चैतन्याच्या स्तरावर कार्यरत होऊन ते प्रक्षेपित होऊ लागण्यासाठी पूरक असलेले अष्टांग साधनेतील टप्पे

साधनेत आपण पुढे पुढे उन्नती करत गेलो की, आपल्यातील पंचतत्त्वांपैकी एकेक तत्त्व चैतन्याच्या स्तरावर कार्यरत होऊन ते प्रक्षेपित होऊ लागते. या प्रक्रियेसाठी अष्टांग साधनेतील कोणते अंग (टप्पा) कोणत्या पंचतत्त्वासाठी पूरक आहे, हे पुढील सारणीत दिले आहे.

४. अष्टांग साधनेचे पंचतत्त्व जागृतीचे कार्य

४ अ. पृथ्वीतत्त्वाची जागृती : मनुष्यात जन्मोजन्मीचे संस्कार, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू असतात. स्वभावदोष-निर्मूलन (आणि गुणसंवर्धन) अन् अहं-निर्मूलन यांची प्रक्रिया राबवू लागल्याने, तसेच नामजप करू लागल्याने हळूहळू स्वभावदोष आणि अहं हे दूर होऊ लागतात. यामुळे देहाची शुद्धी होऊ लागते. म्हणजेच देहातील पृथ्वीतत्त्वातील जडत्व दूर होऊ लागून ते चैतन्याच्या स्तरावर कार्यरत होऊ लागते. तेव्हा आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांच्या पुढे जाऊ लागते.

४ आ. आपतत्त्वाची जागृती : साधनेच्या दुसर्‍या टप्प्यात भावजागृतीसाठी प्रयत्न करू लागल्यावर मनुष्यातील आपतत्त्वाला जागृती येऊ लागते. भाव तिथे देव असे म्हटले आहे. देवाला अनुभवायचे असेल, त्याच्याशी अनुसंधान ठेवायचे असेल, तर आपल्यात भाव निर्माण व्हायला हवा. भावाचा ओलावा हा आपतत्त्वाशी संबंधित आहे. भाव जागृत होऊ लागला की, आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांच्या पुढे वाढू लागते.

४ इ. तेजतत्त्वाची जागृती : साधनेच्या तिसर्‍या टप्प्यात सत्संग आणि सत्सेवा महत्त्वाची. सतत सत्मध्ये राहू लागल्याने मायेचा विसर पडू लागतो. त्यामुळे देहाला सतत चैतन्य मिळत जाते. चैतन्य म्हणजेच तेजतत्त्व. चैतन्य मिळवता येऊ लागले की, आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांच्या पुढे वाढू लागते, म्हणजेच संतपद येते.

४ ई. वायुतत्त्वाची जागृती : साधनेच्या चौथ्या टप्प्यात त्याग महत्त्वाचा. जीवनात त्याग केल्याशिवाय काही मिळवता येत नाही. साधनेत तन, मन आणि धन यांचा त्याग करावा लागतो. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणे, हाही त्यागच आहे. त्यागामुळे देहभान विसरायला होते. त्यामुळे हलकेपणा येतो. आपल्यात मृदुता येते. हीच स्वतःतील वायुतत्त्वाला आलेली जागृती ! हे होऊ लागले की, आध्यात्मिक पातळी ८० टक्क्यांच्या पुढे वाढू लागते, म्हणजेच सद्गुरुपद येते.

४ उ. आकाशतत्त्वाची जागृती : साधनेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात प्रीती आत्मसात करावी लागते. प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रेम. यामुळे सर्वजण आपले वाटू लागतात. प्रीतीमुळे आकाशासारखी व्यापक दृष्टी येते. आपण सर्वांगांनी विचार करायला शिकतो. ईश्‍वर अखिल ब्रह्मांडाचा कारभार पहातो. हीच त्याची प्रीती. हेच ते आकाशतत्त्व ! आपल्यात प्रीती येऊ लागली की, आध्यात्मिक पातळी ९० टक्क्यांच्या पुढे वाढू लागते, म्हणजेच परात्पर गुरुपद येते.

अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या अष्टांग साधनेमुळे सहज आध्यात्मिक उन्नती होऊन ईश्‍वरप्राप्ती हे ध्येय गाठता येते.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२६.२.२०२३)