‘जी-२०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी गोव्यात

(जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर यांचा एक गट आहे.)

पणजी, १५ एप्रिल (वार्ता.) – ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या १७ ते १९ एप्रिल या कालावधीत गोव्यात होणार्‍या आरोग्य क्षेत्र कार्यगटाच्या बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय निमंत्रित प्रतिनिधींच्या पहिल्या पथकाचे १५ एप्रिल या दिवशी सकाळी गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

‘जी-२०’ आरोग्य गटाच्या बैठकीसाठी स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतील प्रतिनिधींचे गोव्यात आगमन

‘जी-२०’ आरोग्य गटाच्या बैठकीसाठी स्वित्झर्लंड देशातील ७, तर अमेरिकेतील २ प्रतिनिधींचे गोव्यात आगमन झाले. ‘जी-२०’ परिषदेच्या आरोग्य गटाची गोव्यात होणारी ही दुसरी बैठक आहे.

दाबोळी विमानतळावर आलेल्या या प्रतिनिधींचे खास गोमंतकीय संगीत वाद्ये वाजवून स्वागत करण्यात आले. प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर भव्य, आकर्षक आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी रांगोळी काढण्यात आली आहे. यानंतर लाल गालिचावरून या प्रतिनिधींना ‘सी.आय.एस्.एफ्.’च्या सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात ‘ग्रॅण्ड हयात’ हॉटेलमध्ये नेण्यात आले. विमानतळावर प्रतिनिधींसाठी चलन विनिमय कक्ष, सीमकार्ड कक्ष आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बैठकीसाठी अनेक देशांचे प्रतिनिधी पुढील काही दिवसांत येणार आहेत.

‘जी-२०’ शिखर परिषदेच्या बैठकीत जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा धोरणांची भावी दिशा ठरणार

‘जी-२०’ शिखर परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कीये, इंग्लंड, अमेरिका आणि युरोपीय महासंघ यांचा समावेश आहे. हा जगातील सर्वांत शक्तीशाली गट आहे.  गोव्यात १७ ते १९ एप्रिल या कालावधीत होत असलेल्या आरोग्य क्षेत्र कृती गटाकडून जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा धोरण आणि उपक्रम यांची भावी दिशा ठरवली जाणार आहे.