जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : १३ जणांचा मृत्यू

पुणे – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर १५ एप्रिलला पहाटे ४ वाजता एका खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर अनुमाने २५ जण घायाळ झाले.घायाळ झालेल्यांना खोपोलीतील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.  मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट हे पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याहून परत येतांना या वादक गटाच्या बसचा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोठा अपघात झाला. ही बस शिंगरोबा मंदिराच्या अलीकडील घाटात दरीत कोसळली. वाहनचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला असल्याची शक्यता आहे.

 मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांचे, तर मुख्यमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !

या अपघाताविषयी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली, तसेच कामोठे येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात जाऊन घायाळांची विचारपूस केली. यासह त्यांनी या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे साहाय्य, तर घायाळांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याची  घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आणि मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये, तर घायाळांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.