पू. सौरभ जोशी यांच्या खोलीत सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

पू. सौरभ जोशी

 १. पू. सौरभदादांच्या खोलीत दैवी सुगंध येणे आणि त्यांना मनातील विचार सांगितल्यावर मन स्थिर होणे

सौ. प्रज्ञा परब

‘१२.१.२०२१ या दिवशी सकाळी मला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पू. सौरभ जोशी यांच्या खोलीत सेवा मिळाली. मी १० मिनिटे त्यांच्या खोलीत होते. पू. सौरभदादांच्या खोलीत गेल्यावर मला दैवी सुगंध आला. त्यांच्याकडे पाहून माझे मन भरून आले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. मी त्यांना माझ्या मनातील नकारात्मक अन् काळजीचे विचार सांगितले. मी त्यांना सांगितले, ‘‘माझी देवावरील श्रद्धा न्यून पडते.’’ नंतर माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबले आणि माझे मन स्थिर झाले.

२. पू. सौरभदादांच्या पलंगाच्या बाजूला बसून नामजप करतांना मन एकाग्र होणे आणि ‘पू. दादांच्या चरणांतून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे दिसणे 

मी पू. सौरभदादांच्या पलंगाच्या बाजूला बसले. माझा ‘परम पूज्य, परम पूज्य’ असा नामजप चालू झाला. नंतर काही वेळाने माझा नामजप बंद झाला आणि मी निर्विचार स्थिती अनुभवू लागले. माझा श्वास एका लयीत होत होता आणि माझे श्वासाकडे लक्ष होते. माझे मन एकाग्र झाले होते. त्या वेळी ‘पू. सौरभदादांच्या चरणांतून माझ्याकडे पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले.

देवा, केवळ तुझ्याच कृपेने मला या १० मिनिटांत मनाची स्थिरता अनुभवता आली. माझ्या मनातील नकारात्मकता, काळजी आणि विचार नष्ट करण्यासाठी गुरुदेवांनी केलेली कृपा मला अनुभवता आली, ती त्यांच्या चरणी अर्पण करते.’

– सौ. प्रज्ञा चेतन परब, फोंडा, गोवा. (१२.१.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक