भावपूर्ण सेवा करून परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे बनण्यासाठी प्रयत्न करणारे फोंडा, गोवा येथील श्री. प्रतीक जाधव (वय ३१ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल पक्ष अष्टमी (२९.३.२०२३)  या दिवशी श्री. प्रतीक जाधव यांचा ३१ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. काटकसरी वृत्ती

श्री. प्रतीक जाधव

अ. श्री. प्रतीक कोणतीही वस्तू फार काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरतात. ते एखादी वस्तू आवडली; म्हणून ती लगेच घेत नाहीत, तर तिची उपयुक्तता पाहून विचारपूर्वक घेतात. त्यांचे कपडे कितीही जुने असले, तरी ‘ते नवीनच आहेत’, असे वाटतात.

आ. ते घरात असणार्‍या अन्नपदार्थांविषयीही सतर्क असतात. काही वेळा माझ्याकडून शीतकपाटातील पदार्थ वेळेत पाहिले न गेल्यामुळे खराब होतात; परंतु श्री. प्रतीक कोणताही पदार्थ शिल्लक राहिल्यास तो कधीच टाकून देत नाहीत. दुसर्‍या दिवशी त्याचा काहीतरी वेगळा पदार्थ बनवून ते तो संपवतात. ते अन्न कधीच वाया घालवत नाहीत.

सौ. कीर्ती प्रतीक जाधव

२. घरातील कामांत साहाय्य करणे : पू. आईंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) त्यांच्यावर लहानपणापासून सेवेचा संस्कार केला आहे. आम्ही जेव्हा घरी एकत्र जातो, तेव्हा श्री. प्रतीक मला स्वयंपाक करण्यात साहाय्य करतात, तसेच काही वेळा मला बरे वाटत नसल्यास ते पू. आईंना स्वयंपाक आणि घरातील अन्य कामे यांत साहाय्य करतात. घरातील कामांत साहाय्य करतांना त्यांची कधीच चिडचिड होत नाही.

३. ऐकण्याची वृत्ती : श्री. प्रतीक त्यांच्या आईंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) सांगितलेले साधनेचे दृष्टीकोन मनापासून ऐकून घेतात आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात. साधना करत असतांना त्यांचा काही कारणाने संघर्ष होत असेल, तर ते पू. आईंशी बोलून घेतात.

४. प्रेमभाव : श्री प्रतीक यांची कोणत्याही वयाचा साधक अथवा समाजातील व्यक्ती यांच्याशी लगेच जवळीक होते.

५. वयस्कर आणि रुग्ण व्यक्तींची सेवा मनापासून करणे

५ अ. रुग्ण व्यक्तीला प्रोत्साहन मिळेल किंवा उत्साह वाटेल, अशा पद्धतीने बोलणे : त्यांना वयस्कर आणि रुग्ण व्यक्तींची सेवा करायला फार आवडते. ते रुग्ण व्यक्तीला जेवण जात नसेल, तर ‘तिला काय बनवून देऊ शकतो ?’, असा विचार करून ते त्या व्यक्तीला जेवण देतात, तसेच ‘त्या व्यक्तीला उत्साह वाटेल’, अशा पद्धतीनेच तिच्याशी बोलतात. त्यामुळे ती व्यक्ती स्वतःचे दुखणे विसरून उत्साही होते आणि आनंदाने अन्न ग्रहण करते.

५ आ. प्रतीक यांनी त्यांच्या आजोबांची (पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या वडिलांची) सेवा मनापासून केली.

५ इ. रुग्ण साधकासह रहातांना रुग्णालयात झोपण्यासाठी कुठेच जागा नसल्याने कठीण परिस्थितीतही सहजतेने रहाणे : कोरोना काळात आश्रमातील एका साधकाला शासकीय रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी श्री. प्रतीक यांचे रुग्ण साधकासह ३ – ४ दिवस रुग्णालयात रहाण्याचे नियोजन झाले होते. रुग्णालयात पुष्कळ रुग्ण असल्यामुळे झोपण्यासाठी पलंग उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्ण साधकालाही भूमीवर गादी घालून झोपवले होते. रुग्णासह येणार्‍या व्यक्तीला झोपण्यासाठी कुठेच जागा नव्हती. त्या वेळी मी भ्रमणभाष करून प्रतीक यांना याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये रहाण्याची सवय असायला हवी. पुढे आपत्काळामध्ये आपल्याला कशा स्थितीत रहावे लागेल, ते सांगता येत नाही.’’ त्यांच्याशी बोलतांना ‘प्रतीक यांच्या मनात या सेवेविषयी भाव असल्यामुळे त्यांना याचे काहीच वाटले नाही’, हे माझ्या लक्षात आले.

६. उत्तरदायी साधक सांगत असलेल्या चुकांविषयीचा भाव

६ अ. चुका सांगणार्‍या साधकाच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे आणि त्यांना ‘चुका लक्षात येऊन त्या स्वीकारता येऊ देत’, अशी प्रार्थना करणे : श्री. प्रतीक यांची प्रकृती लहानपणापासूनच अत्यंत चंचल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सेवा करतांना चुका होतात. त्या वेळी त्यांना उत्तरदायी साधक त्यांच्या चुका सांगतात. याविषयी मी त्यांना विचारले असता ते म्हणतात, ‘‘मला साधक चुका सांगतात, तेव्हा त्या साधकांच्या ठिकाणी मला ‘प.पू. डॉक्टरच बसले आहेत’, असे दिसते. तेव्हा मी प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून सांगतो, ‘प.पू. डॉक्टर, मला हे सर्व पेलवत नाही. मला माझ्या चुका स्वीकारताही येत नाहीत. मला माझ्या चुका लक्षात येऊन त्या स्वीकारता येऊ देत.’ त्या वेळी ‘माझ्यासमोर प.पू. डॉक्टर बसले आहेत’, असे दिसत असल्याने ‘चुका कोण सांगत आहे ?’, हे मला दिसत नाही.

६ आ. आवडीची सेवा न करता प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे करण्याचा प्रयत्न करणे : श्री. प्रतीक ध्वनीचित्रीकरणाची सेवा चालते, त्या ठिकाणी सेवा करतात. ही सेवा करतांना त्यांचा अनेक वेळा संघर्ष होतो. याविषयी त्यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘आपल्या प्रगतीला आवश्यक आहे, त्याच ठिकाणी देव आपल्याला सेवा देतो. त्यामुळे तू ही सेवा करून पहा.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती सेवा करून पाहिली; परंतु ‘त्यांची  साधना होत नाही’, या विचाराने ते अस्वस्थ असायचे. एकदा त्यांच्या मनामध्ये आपोआपच त्या सेवेविषयी पुढीलप्रमाणे विचार आले, ‘माझी प्रकृती चंचल असल्याने आणि मन अस्थिर असल्याने प.पू. डॉक्टरांना ‘मी स्थिर रहाणे’ अपेक्षित आहे. माझ्या साधनेच्या दृष्टीने सर्वप्रथम माझ्यामध्ये पालट व्हायला हवा. मी त्यांना अपेक्षित असे न करता माझ्या मनाप्रमाणे केल्यास माझी साधना होणार नाही’, असे वाटून त्यांनी ती सेवा मनापासून स्वीकारली.

७. प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे प्रयत्न होत नसल्याविषयी क्षमायाचना करणे : मागील काही दिवसांपासून श्री. प्रतीक यांना ‘प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना व्हायला हवी’, असे वाटत आहे. ते प.पू. डॉक्टरांना आत्मनिवेदन करतात. ते प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून अनुभवतात. त्यांच्या चरणांजवळ बसून रडतात आणि प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे प्रयत्न होत नसल्याबद्दल क्षमायाचना करतात.

श्री. प्रतीक यांचा भाव जागृत झाल्यावर ‘भगवंतासाठी काय करावे ?’ याविषयी भगवंतानेच त्यांना सुचवलल्या काही पंक्ती

देवा, प्रत्येक क्षणी तुझ्या स्मरणामध्ये रहावे ।

देवाने पहात रहावे आणि आपण त्याला अनुभवावे ।
देवाने सांगत रहावे आणि आपण ऐकत रहावे ।। १ ।।

देवाने देत रहावे आणि आपण घेत रहावे ।
देवाने चालवावे आणि आपण चालत रहावे ।। २ ।।

आपण देवाला काय देणार ? आपण केवळ कृतज्ञ रहावे ।
आपले मन केवळ भगवंतासाठी तळमळत रहावे ।। ३ ।।

आपले मन इतके शुद्ध आणि निर्मळ असावे की, देवाला तेथे यावेसे वाटावे ।
आपले मन इतके स्वच्छ असावे की, देवाला तेथे रहावेसे वाटावे ।। ४ ।।

देवा, माझे मन निरपेक्ष रहावे अन् मी तुला अपेक्षित असे करावे ।
तुझ्याविना देवा, मला कुणीच न दिसावे ।। ५ ।।

देवा, तुझ्या प्रेमामध्ये बुडून जावे की, पेशीपेशीने ते प्रेम अनुभवावे ।
देवा, प्रत्येक क्षणी तुझे रूप आठवावे आणि तुझ्या स्मरणामध्ये अखंड रहावे ।। ६ ।।

प.पू. गुरुमाऊली, ‘श्री प्रतीक यांच्यातील भाव आणि श्रद्धा मलाही शिकता येऊ दे अन् त्याचा माझ्या साधनेसाठी लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– सौ. कीर्ती प्रतीक जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०२३)