पणजी – आमच्या तत्त्ववेत्या ऋषिमुनींनी दिलेली वैश्विक सांस्कृतिक विचारधारा म्हणजेच भारतीयता आहे. हे जाणून या सांस्कृतिक ठेव्याविषयी अधिकाधिक जाणून घेवून ही उदात्त विचारसरणी आपण अनुसरली पाहिजे, असे आवाहन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केले. ६ एप्रिल या दिवशी सायंकाळी ‘दी इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोवा’च्या मांडवी सभागृहात आयोजित केलेल्या ‘भारतीयता : डिस्कोर्स आणि प्रॅक्टीस (भारतीयता : प्रवचन आणि सराव) या विषयावरील भाषणात त्यांनी हे आवाहन केले.
(सौजन्य : Goan varta live)
राज्यपाल आरिफ महंमद खान यांच्या भाषणातील महत्त्वाची सूत्रे . . .
१. भारतीयता म्हणजे विविधतेचा आदर आणि स्वीकार करणे. आम्ही कुठल्याही विचारधारेला आमचा प्रतिस्पर्धी मानत नाही; कारण सर्व मार्ग हे एकाच ठिकाणी घेऊन जातात आणि हा एकच जन्म नाही, तर कर्मानुसार आम्ही अनेक जन्म घेतो, असे आम्ही मानतो.
२. सर्वांत चैतन्य आहे, हे आम्ही जाणतो. आमची संस्कृती आम्हाला शिकवते की, जे आम्ही पेरतो, ते आम्हाला मिळते. हे तत्त्वज्ञान आम्ही आचरणात आणले, तर कुणी कुणाच्या अधिकारावर गदा आणणार नाही.
३. भारत आता जगातील उगवती शक्ती म्हणून पुढे येत आहे. असे असले, तरी कुठल्याही अन्य राष्ट्राला भारताविषयी भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.
४. आमच्या मोठ्या सांस्कृतिक ठेव्याविषयी आम्ही अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही आमच्या समृद्ध वारशावर पुढील वाटचाल केली पाहिजे आणि नवीन शिखरे गाठली पाहिजेत.
५. जेव्हा आमचा देश राजकीयदृष्ट्या विविध राजेशाहीत विभागला होता; दळणवळणाची, संवादाची कोणतीही मोठी साधने नव्हती, त्या काळातसुद्धा आमच्या विचारवंतांकडे वैश्विक विचारदृष्टी होती.
६. आता अनेक देश उदारमतवादी बनत आहेत; पण ही संकल्पना आम्हाला नवीन नाही. भारत हा पूर्वीपासून उदारमतवादी आहे. आम्ही उदारमतवाद हा निसर्गनियम म्हणून मानला त्याचबरोबर आमच्या तत्त्ववेत्यांनी ‘सर्व मतांचा आदर करा’, अशी शिकवण आम्हाला दिली.
क्षणचित्र : राज्यपाल खान यांनी महाभारत, रामायण आणि वेद यांतील संस्कृत सुभाषिते उद्धृत केली.